
दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | बारामती |
आबाजीनगर (धुमाळवाडी), बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप परशुराम कोकरे यांच्या मातोश्री कै. सौ. लक्ष्मीबाई परशुराम कोकरे (भाभी, वय ७५) यांना देवाज्ञा झाली. सौभाग्याचे अहेव लेणं घेऊनच भाभी देवाघरी गेल्या. भाभीने अत्यंत चिकाटीने काळ्या आईची सेवा केली. प्रसंगी गड्यासारखी शेतातील कामे करून लेकरांना संस्कार व शिक्षण दिले. जणू खुरपेच आंदण दिल्यासारखी सेवा केली. भाभीच्या स्मृतीप्रित्यर्थ पती, मुलगा, ३ मुली, नातवंडे यांनी रक्षा व अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता रानातच वृक्षारोपण करून समाजात आदर्श निर्माण केला आहे.
नदीचे प्रदूषण थांबविणे व अयोग्य प्रथा नष्ट करणे, कथाकार-प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्याख्यानांतून व कृतीतून ही चळवळ उभी करून ते सतत आवाहन करतात. त्याला समाजात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पणदरे पंचक्रोशीत या उपक्रमाचे कौतुक होत आहे.