दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । मुंबई । महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशी येथील स्मारकास भेट दिली. उद्या दि. 18 जून रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा 164 वा स्मृतीदिन असून आज त्यांनी येथील किल्ल्यास भेट देऊन स्मृतीशिल्पास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आज माँ जिजाऊचा स्मृती दिन आहे. माँ जिजाऊ साहेब, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांनी सती न जाता राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. झाशी येथील 300 वर्षे जुने गणेश मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या स्थानिक मराठी मंडळाच्या वतीने त्यांना पूजेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी वस्तूसंग्रहालयास भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या ठिकाणास भेट द्यावी, अशी इच्छा येथील मराठी बांधवांनी व्यक्त केली. झांशी, लखनौ, कानपूर, वाराणसी या भागातील असंख्य मराठी बांधवांचे सशक्तीकरण, एकत्रीकरण आणि समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
आजच्या भेटीने मराठी सैन्याचा, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, बाजीराव पेशवे यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा इतिहास मनात जागृत झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. यावेळी महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटी सचिव गजानन खानवलकर, उज्ज्वल देवधर, राहुल खांडेश्वर, संजय तळवळकर, मिलिंद देसाई, मीना खंडकर, आरती अभ्यंकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी उत्तरप्रदेश विधानसभेचे सभापती राहिलेल्या आचार्य रघुनाथ धुळेकर यांच्या स्नुषा व डॉ. गोऱ्हे यांच्या आत्या डॉ. लता धुळेकर यांची सदिच्छा भेट घेवून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेल्या “बुंदेलखंड पन्ना राज्य व मराठ्यांचे संबंध” याविषयी माहिती घेतली.