गोष्‍ट बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा

मी पत्रकारितेत आल्यानंतर बा. सी. मर्ढेकर यांच्या साहित्यविश्वाकडे ओढलो गेलो होतो. त्यांच्या साहित्याचे आणि जीवनाचे एक आकर्षण निर्माण झाले होते. नवकवितेचा जनक, युगप्रवर्तक कवी आपल्या सातारा जिल्ह्याचा आहे. या कविच्या साहित्यावर अनेकांनी अभ्यास करण्यात आपले आयुष्य वेचले आहे, त्याचाही वेगळा अभिमान वाटायला लागला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना केल्यानंतर बा. सी. मर्ढेकर यांच्याविषयीचा लळा वाढतच गेला. त्यातून बा. सीं. चे सरकारी स्मारक लवकर साकारायला हवे याचा ध्यास घेऊन काम करत होतो.

दरम्यानच्या काळात सातारचे तत्कालिन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बा. सी. मर्ढेकर स्मारक समिती स्थापन केली. असाच एक दिवस मर्ढे येथे अजित जाधव यांना भेटण्यासाठी गेलो असता, त्यांनी बा. सी. मर्ढेकर यांच्या घराची दुरावस्था दाखवली. घराची दुरावस्था बघून मन अतिशय विषण्ण झाले. अजित जाधव याने किमान घराचे पत्रे जरी बदलले तरी पाच ते दहा वर्षे त्याचे आयुष्य वाढेल, असे सांगितले आणि तुम्हीच हे काम करु शकता, अशा शब्दात विश्वासही दाखवला आणि गळही घातली. त्याचवेळी या घराची सेवा करणाऱ्या हिराबाई निकम यांनीही डोळ्यात अश्रू आणून हे घर वाचवा, अशी आर्जव केली. त्या अस्वस्थेतूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेमार्फत मर्ढेकर यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या टप्प्यात किमान पत्रे बदलूयात, असे ठरवले. पत्रे बदलण्यासाठी निधी जमवण्यास सुरुवात केली. पत्रे बदलण्याएवढा निधी जमल्यानंतर ते काम कोणाकडून करुन घ्यायचे यासाठी माझा मित्र अतुल जाधव याच्याकडे विचारणा केली. त्याने मी काम करुन घेतो, असे सांगितले. ज्यावेळी पत्रे बदलण्यासाठी घराची पाहणी संबंधित मिस्त्रीने केली. त्यावेळी त्याने फक्त पत्रे बदलता येणार नाहीत. ज्या स्ट्रक्चरवर पत्रे बसवले आहेत, ते लाकडाचे आहे आणि त्याला वाळवी लागली आहे. पत्रे काढतानाच ते सगळे स्ट्रक्चर तुटेल आणि पुन्हा ते जोडून पत्रे बसवणे हे धोकादायक आहे, असे सांगितले. त्यासाठी तिथे नवीन स्ट्रक्चर करावे लागेल आणि ते आता पूर्वीसारखे लाकडात करता येणार नाही. कारण तशाप्रकारचे काम करणारे सुतार आता फारसे राहिले नाहीत, असे सांगितले. त्याशिवाय काही भींतीही ठिसूळ झाल्या आहेत. पावसाळ्यात भींतींना ओल येते आणि त्यामुळे त्याचेही काम करावे लागेल. भींतीचा जेवढा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे, त्याचे बांधकाम करावे लागेल, असे सांगितले. हे सगळे काम करण्यासाठी वीजेचे कनेक्शनही लागेल, असे त्यांनी सांगितले. वीजेचे कनेक्शन त्या घरात नव्हते.

पूर्वी बा. सीं. चे चिरंजीव राघव मर्ढेकर हिराबाईंना देखभालीसाठी मनिऑर्डर करायचे. त्यातून त्या घराचे लाईटबील भरायच्या आणि देखभाल करायच्या. मात्र गेल्या दोन वर्षापासून मनिऑर्डर येणे बंद झाले. लाईटचे कनेक्शन कट झाले. मीही शेजारी मुंबईला राहणाऱ्या मर्ढेकरांच्या घरात राहते. माझे वय झाले आहे. माझी गुजरान करणेही शक्य नाही. ठिक आहे, आम्ही वीजेचे कनेक्शन घेऊ आणि त्याचे बिलही भरु, असे आम्ही सांगितले आणि तिथून बाहेर पडलो. वीजेचे कनेक्शन घेण्याची चौकशी केली असता ते कनेक्शन घर मालकाच्या नावावर मिळते किंवा त्यांनी कोणाला अधिकार दिला असेल तर त्याच्या नावावर मिळते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की करायचे काय? कारण बा. सी. मर्ढेकर यांचा मुलगा राघव मर्ढेकर हे दिल्लीला राहतात, इतकीच मर्यादीत माहिती माझ्याजवळ होती आणि त्याचा ठावठिकाणा, मोबाईल नंबर असे आमच्याजवळ काहीच नव्हते. पत्रे बदलण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्याची परवानगीही मागितली नव्हती आणि फक्त पत्रेच बदलायचे असल्याने कशाला हवी परवानगी, असा विचारही केलेला होता. मात्र आता परवानगीशिवाय पुढे काहीच करता येणार नाही, असे लक्षात आले होते.

मर्ढेकरांच्याच एका कवितेतील गणपत वाण्यासारखी आमची अवस्था झाली होती. आम्हाला पुढे कसे जायचे आणि काय काय करायचे याचे सूत्रच जमत नव्हते किंवा मनात ते ठरत नव्हते. मर्ढेकरांवर प्रेम करणाऱ्या अनेक साहित्यीक आणि मर्ढेकरप्रेमींना सावित्री सदन या वास्तूचे जतन व्हावे, असे प्रामाणिकपणे वाटत होते. मात्र ते घडताना दिसत नव्हते किंवा त्याचा मार्ग दिवसेंदिवस कठीण वाटत चालला होता. त्यामुळेच गणपत वाणी कवितेची आठवण आम्हाला होत होती.

गणपत वाणी बिडी पिताना

चावायाचा नुसतीच काडी

म्हणायचा अन मनाशीच की

या जागेवर बांधीन माडी

या ओळींसारखी आमची अवस्था झाली होती. मनातल्या मनातच आम्ही पत्रे बदलण्याची स्वप्ने रंगवत होतो. फक्त बिडी पिण्याची सवय आम्हाला नव्हती. त्यामुळे स्वप्नांवरती धूर सांडणे, असे बा. सी. मर्ढेकर यांनी आपल्या कवितेत जे लिहिले आहे, तोच अनुभव आम्हाला बिडी न पिताही येत होता. आमच्या स्वप्नांवरही धुर सांडत चालला होता. कवितेतील गणपत वाण्यासारखी आमची अवस्था जरी पहिल्या टप्प्यात झाली असली तरी मर्ढेकरांनी कवितेचा शेवट करताना जसे लिहिले आहे की एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला तशी अवस्था पुढच्या प्रवासात आमची होणार होती. मात्र कोणतीही गोष्ट प्रत्यक्षपणे साकारण्याआधी खूप यातना सोसाव्या लागतात आणि बरेच प्रयत्नही करावे लागतात. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याच्याच पाठीशी परमेश्वर उभा राहतो, असा अनुभव वारंवार येत असतो आणि तसाच अनुभव या विषयातही आम्हाला यायचा होता.

मर्ढेकरांच्या घराचे पत्रे बदलायचे असतील तरी त्यांच्या वशंजाच्या परवानगीशिवाय काहीही करता येणे शक्य नव्हते, त्यामुळे मर्ढेकरांच्या वंशजांचा शोध घेणे आवश्यक होते. मर्ढेकरांचे एकमेव वंशज आणि त्यांचे सुपुत्र राघव मर्ढेकर हे दिल्लीत राहतात, एवढीच माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली होती आणि त्यांच्याशी संपर्क साधल्याशिवाय पुढे जाता येणारच नव्हते, हेही आम्हाला समजले होते. मर्ढेकरांची ही माडी सुस्थितीत ठेवण्याचा आमचा विचार पक्का होता. त्यानुसार आम्ही राघव मर्ढेकर यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. मात्र राघव महाराष्ट्रातील फारसे कोणाच्याही संपर्कात नव्हते. शाहूपुरी शाखेचे मार्गदर्शक किशोर बेडकिहाळ यांनी राघव यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. किशोर बेडकिहाळ यांनी राघव यांचा नंबर मिळवला. त्यानंतर राघव मर्ढेकर हे मराठीत बोलत नसल्याचे आम्हाला समजले. राघव यांच्याशी संपर्क कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर मी किशोर बेडकिहाळ यांना तुम्हीच त्याच्याशी संपर्क साधा आणि हे घर हे मराठी साहित्य विश्वाच्या दृष्टीने अनमोल ठेवा आहे आणि ते जतन करणे गरजेचे आहे,असे त्याला पटवून सांगा, असे सांगितले. किशोर बेडकिहाळ यांनी राघव मर्ढेकर यांच्याशी बोलणी केली. मात्र राघव हे दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने ते दिल्लीवरुन मर्ढे येथे येण्यास असमर्थ होते आणि वीजेचे कनेक्शन घेणे किंवा इतर मदत करणे प्रत्यक्ष त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुणे येथे राहणारे त्यांचे मामा सदाशिव पाडळीकर यांच्याशी अधिक बोलणी करावी, असे राघव यांनी किशोर बेडकिहाळ यांना सांगितले. त्यावर पुणे येथे जावून सदाशिव पाडळीकर यांच्याशी बोलणी करावी, असे ठरले. ही बोलणी करण्यासाठी किशोर बेडकिहाळ आणि शाहूपुरी शाखेचे कार्यक्षम कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी जावे, असे ठरले. त्यानुसार हे दोघे पुणे येथे मर्ढेकर यांचे मामा आणि इतर नातेवाईक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले.

राघव यांच्या प्रवासासाठी असलेल्या असमर्थतेमुळे पेच वाढणार आहे की काय? असा प्रश्न पडला होता. मात्र राघवचे मामा सदाशिव पाडळीकर आणि मर्ढेकरांच्या नातेवाईक रश्मी तुळजापूरकर यांच्याशी बेडकिहाळ आणि सावंत यांनी ज्या प्रकारे चर्चा केली आणि त्यांना जो विश्वास दिला त्यातून भव्य आणि वेगळेच काही घडेल, असा दिशेने सगळा प्रवास सुरु झाला. मर्ढेकर यांचे सगळेच नातेवाईक जे आम्हाला भेटले ते किमान सत्तरीच्या पुढच्या वयाचे होते मात्र ते सगळेच आम्हाला हवे ते सहकार्य करण्यास तयार होते. मी स्वत: शांतपणे विचार केला की फक्त पत्रे बदलण्यापेक्षा संपूर्ण घराचे नुतनीकरण करुन त्याला एक छान रंगरुप दिले तर साहित्यविश्वासाठी ते एका मंदिरासारखे होईल. मर्ढेकरांना नाही किमान त्यांच्या वास्तूला स्पर्श केला तर एका दैवत्वाची अनुभूती साहित्य पंढरीच्या वारकऱ्यांना मिळेल.

मर्ढेकरांना निवृत्तीनंतर मर्ढे येथे येवून रहायचे होते. त्यांचे ते स्वप्न अपुरे राहिले होते. हे स्वप्न वेगळ्या प्रकारे पूर्ण करण्याची संधी आम्हाला चालून आली होती. ही वास्तू सजवली आणि देखण्या रुपात पुढे आणली तरी बघणाऱ्याचे डोळे दिपावून जातील आणि मनाला वेगळे समाधान मिळेल, असा विचार मी केला आणि तो नंदकुमार सावंत यांच्याकडे मांडला. सावंत आणि बेडकिहाळ यांनी तो मर्ढेकर यांच्या नातेवाईकांना पटवून द्यावा, असे मी त्यांना सांगितले. दरम्यानच्या काळात मुख्य केंद्राची या कामासाठी परवानगी घेणेही आवश्यक होते. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे धडाडीचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली. राघव मर्ढेकर यांनी जर परवानगी दिली तर संपूर्ण घराचे नुतनीकरण करुन ते सुंदरपणे सजवूयात, असे सांगितले. प्रा. जोशी यांनी या कल्पनेचे जोरदार स्वागत केले. चांगल्या कामासाठी परवानगीची आवश्यकता काय?, असा उलट सवाल त्यांनी केला. साहित्यीकांची स्मारके, त्यांची निवासस्थाने जर आपल्याला संरक्षित करता येत असतील तर त्याहून आनंदाची आणि स्वागताची दुसरी कोणती गोष्ट असू शकते, असे त्यांनी सांगितले.

शाहूपुरी शाखेच्या प्रत्येक उपक्रमाला प्रा. मिलिंद जोशी यांनी बळ दिले आहे. बा. सी. मर्ढेकर यांच्या घराच्या नुतनीकरणाच्या कामाच्यावेळीही त्यांनी तुम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी. माझा तुम्हाला पूर्ण पाठींबा आहे, असे सांगितले. त्यामुळे बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे संरक्षण आणि नुतनीकरण हे काम आपण करायचेच, असा आमच्या मनाने चंग बांधला होता. त्यासाठी किशोर बेडकिहाळ आणि नंदकुमार सावंत हेही आघाडीवर होते.

राघव मर्ढेकरांचे मामा सदाशिव पाडळीकर यांचे वय ९२ वर्षे आहे. त्यामुळे ते याविषयीचा निर्णय ते कसा घेणार, हा आमच्यापुढे प्रश्न होता. हा सगळा निर्णय मर्ढेकरांच्या नातेवाईकांनी घ्यावा यासाठी योग्य अशा समन्वयक आणि मर्ढेकरांच्या नातेवाईक रश्मी तुळजापूरकर यांनी फार मोठी भूमिका बजावली. मर्ढेकरांच्या घराचे जतन व्हावे, असे त्यांनाही मनापासून वाटत होते. अगदी मोकळेपणाने सांगावेसे वाटते की रश्मीताईंनी जर पुढाकार घेतला नसता तर मर्ढेकरांच्या घराविषयीचा प्रश्न सोडवणे कठीण गेले असते. रश्मीताई आणि इतर नातेवाईक यांनी भूमिका घेतल्यामुळे राघव मर्ढेकर यांनी हे घर बक्षीसपत्राने आम्हाला देण्याचा निर्णय घेतला. मात्र आम्हाला प्रॉपर्टी कार्डवर कायमस्वरुपी मर्ढेकर हे नाव हवे होते. त्यामुळे आम्ही ते कुळमुखत्यारपत्राने आमच्याकडे घेतले आणि त्यानंतर फक्त पत्रेच बदलले नाहीत तर संपूर्ण घराचे रुपडे आम्ही पालटून टाकले. अतिशय देखणे आणि बा. सी. मर्ढेकर यांनी कधी आपल्या घर कसे सजवावे, याचे स्वप्न बघितले असेल तर ते तसेच किंबहूना त्याहूनही अधिक सुंदरपणे ते उभे करण्यात आम्हाला यश आले.

बा. सी. मर्ढेकर यांच्या घरात त्यांचे एक छायाचित्र, जीवनपट आणि घरात बसतील तेवढ्या कविता लावल्या आहेत. या नुतनीकरण केलेल्या घराचे आम्ही स्मारकात रुपांतर केले आहे. या स्मारक आणि नुतनीकरण केलेल्या घराचे ज्येष्ठ कवयत्री अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आज महाराष्ट्रातील किंबहूना जगाच्या पाठीवरील कोणत्याही मराठी साहित्य रसिकांसाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचा आणि साहित्याचा ठेवा पाहण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अतिशय देखण्या स्वरुपात खुला करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. साहित्य क्षेत्रातील माझ्या कार्यकर्ता या प्रवासामधील हा अतिशय मोलाचा असा सुवर्णक्षण आहे, एवढे नक्की. गणपत वाण्यासारखी स्वप्नातच माढी बांधायची वेळ आमच्यावर आली नाही तर मर्ढेकरांची माढी आम्ही अभिमानाने उभी केली आहे.

विनोद कुलकर्णी,

कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
भ्रमणध्वनी-8007597090


Back to top button
Don`t copy text!