दैनिक स्थैर्य | दि. 11 जुलै 2024 | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण वरून पुढे मार्गस्थ होत असतो हे फलटणकरांचे भाग्य आहे. फलटण येथून पुढे पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना बराच मोठा समाज सोबत असल्याने बराचसा कचरा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तो स्वच्छ करावा या उद्देशाने फलटण मधील हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने नियमित साफसफाई होत असते. मुलांच्या मनामध्ये कायमस्वरूपी साफसफाईचे महत्व निर्माण व्हावे हा या मागील मूळ उद्देश आहे; असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा फलटण येथील पालखीतळ स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी विविध पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की; काल पुणे विद्यापीठांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी फलटण पालखीत स्वच्छता मोहीम केली होती. त्यांनी सुद्धा अत्यंत चांगले काम केलेले आहे. यांच्यासोबतच फलटण मधील बहुतांश शाळांमधील मुले व मुली पालखीतळ स्वच्छतेचे काम करत असतात. स्वच्छता व सेवाभावी बद्दलचा संदेश कायमस्वरूपी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मनामध्ये कोरला जावा; यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
पालखी तळ स्वच्छता मोहिम ही मे.नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, फलटण नगर परिषद, फलटण, पंचायत समिती, फलटण, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, गोविंद मिल्क, फलटण, महाराजा उद्योग समूह, फलटण, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि.फलटण, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि.फलटण, श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था लि.फलटण, पत्रकार बंधू, बिल्डर्स असोसिएशन, क्रीडाई, लायन्स क्लब, जायंट्स ग्रुप, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक बंधू भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला आहे.