
सातारा- भरतनाट्यम नृत्यामध्ये सहभागी झालेल्या मुंबई येथील नृत्य कलाकारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 17 फेब्रुवारी, सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्रीला रात्रभर महाजागरण सोहळा संपन्न झाला .रात्री साडेदहा वाजता सुरू झालेल्या या महाजागरण सोहळ्याचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर या उपक्रमात प्रवचन ,व्याख्यान, भरतनाट्यम, नृत्य ,योग ,प्राणायाम, ओंकार ध्यान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी विविध मान्यवरांनी रात्रभर हा महाजागरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला .
यावेळी शेकडो सातारकरांची उपस्थिती ही लाभली होती. रात्रभर हे विविध कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पहाटे सहा वाजता आरती करून या कार्यक्रमाची सांगतात करण्यात आली. या उपक्रमाविषयी माहिती देताना या महोत्सवाच्या व महा जागरण सोहळ्याच्या संयोजिका उषा शानभाग म्हणाल्या की, गेली सात वर्षे दरवर्षी महाशिवरात्रीच्या रात्री दुसर्या दिवशीच्या पहाटेपर्यंत हा जागरण सोहळा संपन्न होत आहे .त्याला दरवर्षी सातारकर शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. यावर्षी या महोत्सवात ज्येष्ठ निरूपणकार नंदकुमार देशपांडे यांचे प्रवचन झाले .
या नृत्य कार्यक्रमात मुंबई येथील श्रीमती विद्या वेंकटेश्वरा आणि व्यंकटेश्वरा नटनप्रियनादम समूहाचे कलाकार सहभागी झाले होते .या जागरण सेवेत त्यांनी सादर केलेली बहारदार भरतनाट्यम नृत्यही विशेष करून नटराज्याला संबोधित करणारी होती. यावेळी आपल्या प्रवचना बोलताना प्रवचनकार नंदकुमार देशपांडे म्हणाले की ,आत्मबोधने जो संतुष्ट होतो तो खरा स्थितप्रज्ञ .स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी अहंकार नसतो. त्याची बुद्धी स्थिर असते. तो सर्व कामना इच्छा बाजूला सारून तो विश्वात्मक होऊन विश्वात संचारतो .त्याच्या चित्तात समत्व असते .त्याची बुद्धी परमात्मा स्वरूपामध्ये सहज स्थिर राहते.निवांत ठिकाणी ठेवलेला दिवा शांतपणे तेवत राहतो. तसा तो सुद्धा योग्य युक्त रमतो. स्थितप्रज्ञ पुरुष मृत्यू समोर येऊन टाकला ,प्राण देह सोडून निघाला तरी व्याकूळ होत नाही .त्याची ब्रह्म स्थिती अशी की अखेरच्या क्षणी ही तो डगमगत नाही .स्थितप्रज्ञ पुरुष गीतेची आदर्श मूर्ती आहे .पण निष्काम कर्मयोग आचरणात आणणारा खरा स्थितप्रज्ञ असतो तो .आत्म्याच्या ठिकाणी रत असतो. तो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला असतो. असा हा स्थितप्रज्ञ कर्म करूनही बंधनात अडकत नाही. गीतेतील स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे अमलात आणली तर सुख समाधानाचे गौरी शंकर शिखर गाठणे आपण गाठू शकू. यासाठी स्थितप्रज्ञ बना , असा मौलिक उपदेशही त्यांनी या कार्यक्रमात केला.
यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका योगदा महिला मंडळ, नटराज महिला मंडळ आणि नटराज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच नर्मदा परिक्रमा याविषयी जेष्ठ भ्रमंतीकार यशवंत साळुंखे व श्री. देवधर यांचे मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमात यशवंत साळुंखे व काका देवधर यांनी अमरनाथ यात्रा विषयी माहिती दिली तसेच निशांत सपकाळ यांचा वाद्यवृंद विशेष आकर्षण ठरला .यांनी योग ,चक्रा ध्यान, ध्यानधारणा याविषयी माहिती दिली तसेच सुनील पानसे यांनी योग विषयी ही मार्गदर्शन केले .मुंबई येथील नृत्य संस्थेच्या वतीने बहारदार असे भरतनाट्यम सादर करण्यात आले .हा महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होत आहे .याचेच कौतुक वाटते.
या कार्यक्रमानंतर सहभागी कलाकारांचा नटराज मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रमाणपत्र व प्रसाद देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी, वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

