
स्थैर्य, सातारा, दि. 16 सप्टेंबर : सातार्यात 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून त्याची तयारी, नियोजन सुरु आहे.99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह शि.द. फडणीस यांनी केले आहे. या बोधचिन्हाचे अनावरण सातार्यात शनिवार दि.20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत न्यू इंग्लिश स्कूल येथील गणेश सभागृहात होणार असल्याची माहिती 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, सातार्यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याने साहित्यिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात याबाबत उत्सुकता आहे. मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन हे संमेलनाचे आयोजक आहे. सातार्यातील हे संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 या दरम्यान होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्याने दोन्ही संस्थांच्यावतीने संमेलनाच्या तयारी, नियोजनाला वेग आला आहे. 99 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह शि.द. फडणीस यांनी रेखाटले आहे.
या बोधचिन्हाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी 99 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. यावेळी मसाप, पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बोधचिन्हाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.