
स्थैर्य, वडूज, दि. 25 : खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथील येरळा नदीशेजारील ओढ्यात सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू भरणारा डंपर व जेसीबी असा 35 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महेश शशिकांत हिरवे वय 21 (रा सिद्धेश्वर कुरोली) गौरव आनंदराव पवार ( वय 28 रा. उंबर्डे), योगेश सुरेश राऊत (वय 22 रा. सातेवाडी) आकाश सुभाष गोडसे (वय 23 रा. कुरोली फाटा, वडूज) श्रीकांत विठ्ठल बनसोडे (वय 42 रा. नाथमंदिर वडूज) व मंगेश मधुकर मोहिते (वय 25 रा. सजगणे वस्ती, वडूज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक करणार्यां विरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेकडील पथकाने सकाळी 06.30 वाजताचे सुमारास वाकेश्वर, ता.खटाव गावचे हद्दीत विठोबाचा माळ नावाचे शिवारात येरळा नदी शेजारील ओढ्यात छापा टाकला असता तिथे काही इसम जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळु भरत असल्याचे दिसले. त्या इसमांना ताब्यात घेवुन वाळू उत्खनन व वाहतूक करण्याचा परवाना आहे काय असे विचारले असता त्यांनी नसल्याचे सांगितले. नमूद इसम हे बेकायदा बिगर परवाना वाळूचे उत्खनन करुन चोरटी वाहतूक करुन विक्री करण्याच्या उदेशाने मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातील 35,18,000 / – रुपये किंमतीचा जेसीबी व अशोक लेलँड कंपनीचे डंपर जप्त करुन त्यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात वाळू चोरीच्या पर्यावरण संरक्षण अधिनियमासह, आपत्ती निवारण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
या कारवाईत पोलीस हवालदार तानाजी माने, राम गुरव, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, राजू ननावरे, अजित कणे, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, विशा पवार, गणेश कापरे, वैभव सावंत यांनी भाग घेतला.
येरळा नदीपात्रातून कोरोना टाळेबंदीच्या काळात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी येऊनही वडूज पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई वडूज पोलीस कोमात गेल्याचेच लक्षण मानले जात असून दुसरीकडे महसूल विभाग गांधारीच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. तहसीलदारांकडे कोणतीही तक्रार केल्यास त्या पाहते, बघते असे सांगून जुजबी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. कोरोना काळ असल्यामुळे जरी महसूल विभाग इतर कार्यात मग्न असला तरी वाळू चोरीची माहिती तहसील कार्यालयाकडे नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याप्रकरणी महसूल विभागाकडून खुलासा मागवावा, अशी मागणी होत आहे.