
दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | मुंबई |
देशाची आर्थिक स्थिती बिघडली असताना त्यांनी ती आर्थिक स्थिती सावरतानाच स्वत: पंतप्रधान झाल्यानंतर भरीव भूमिका घेऊन देशाला वाचवली. एका चांगल्या व्यक्तीला आज देश मुकला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या यांच्या मंत्रीमंडळात मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, तर शरद पवार यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्या सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे होती. यावेळी शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा आढावा घेतानाच त्यांच्या आठवणीही साांगितल्या. शरद पवार यांनी सांगितले की, मनमोहन सिंग यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. ते अर्थशास्त्रज्ज्ञ होते. उद्याच्या देशाचे भवितव्य यासाठी विचार करायचे. माझा आणि त्यांचा परिचय मुंबईत झाला. ते रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर होते तेव्हा मी मुख्यमंत्री होतो असे शरद पवार म्हणाले. नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात ते अर्थखात्याचे मंत्री होते, माझ्याकडे संरक्षण खातं होतं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसत होत्या. त्यावेळी ते आणि मी सोबत होतो. त्यावेळी मी त्यांची निर्भिड मते ऐकली. देशात त्या १० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेला दिशा मिळाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ट्विट करत शरद पवार यांनी म्हटले आहे की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणार्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!