दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । मुंबई । महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील सर्वात मोठी एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष श्री.आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.
क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया कप 2022 या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.