नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग स्टेशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । मुंबई । नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले की, दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. ही गरज मॅजेंडा कंपनी नक्कीच पूर्ण करील.

यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक मॅक्सन लेविस, संचालक डॅरिल डायस, सुजय जैन, महावीर लुनावत आदी उपस्थित होते.

नवी मुंबई येथे सुरू झालेले हे देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने चार्गिंग स्टेशनसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा व सुटे भाग देखील तयार करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशी बनावटीचे हे सुटे भाग असतील. या ठिकाणी एकूण २१ चार्जर असून यातील चार डीसी चार्जर १५ ते ५० किलोवॅट क्षमतेचे आहेत. तर १७ एसी चार्जर ३.५ ते ७.५ किलोवॅट क्षमतेचे आहेत. यातील एसी चार्जर पूर्णपणे भारतात तयार केले आहे. हे चार्जर एकत्रित ४० केव्ही सौर उर्जेसह स्थानिक ग्रीडला जोडले आहे. या ठिकाणी २४ तास सेवा दिली जाणार असून त्याचा वापर चार्जग्रीड ॲपद्वारे केला जाऊ शकतो. या केंद्रात दरमहा चार हजार एसी चार्जर तयार केले जाणार आहेत, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!