दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२३ । मुंबई । शिरीष कणेकर यांच्या निधनाने रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
क्रिकेट आणि चित्रपट हे शिरीष कणेकर यांचे आवडीचे विषय होते. आयुष्यातील कुठलेही अनुभव क्रिकेट आणि सिनेमाशी रंजक पद्धतीने जोडण्याची त्यांची हातोटी होती. क्रिकेटपटू आणि चित्रपटकलावंत यांच्याशी असलेली त्यांची कलासक्त मैत्री आणि त्यातून त्यांनी उभी केलेली व्यक्तिचित्रे वाचकांवर एक वेगळा प्रभाव निर्माण करून गेली. त्यातही लतादिदी, देव आनंद, सुनील गावसकर ही त्यांची दैवते होती. त्यांच्या रंजक किश्यांच्या खजिन्यामुळे मराठी वाचक विश्वात त्यांनी स्वतःचा स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण केला. त्यांच्या काळातील ते एक सिद्धहस्त विनोदी लेखक म्हणून नावाजले. त्यांची कथाकथनेही तुफान म्हणावी अशी होती जी रसिकांच्या कायम लक्षात राहतील. त्यांचे क्रिकेटपटू आणि चित्रपटकलावंतावरील एकपात्री कार्यक्रमही अनोखे होते.
मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शिरीष कणेकर यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.