स्थैर्य, सातारा, दि.९: कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपासून जलतरण तलाव, चित्रपटगृहे, इनडोअर खेळ, योग संस्था नियमांच्या बंधनात राहून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शहरातील शाहू स्टेडियममधील जलतरण तलावाच्या दुरुस्तीची कामे अद्याप सुरू नसल्याने तलाव बंद आहे. त्यामुळे प्रशासनाने परवानगी देऊनही जलतरण तलावासाठी नागरिकांनी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती; परंतु काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने पर्यटन स्थळे, उद्याने, इनडोअर खेळ व इतर काही ठिकाणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहरातील शाहू स्टेडियममधील जलतरण तलावात जलतरणपटू व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी लहान मुलांनाही पोहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, तलावाची दुरवस्था झाल्याने सद्यःस्थितीत तो बंदच आहे. या तलावात पाण्याचा फिल्टर खराब झाला असून, तलावातील फरशाही तुटलेल्या अवस्थेत आहेत.
मागील आठवड्यात या ठिकाणी तलावाची दुरुस्ती व इतर इनडोअर खेळासंबंधी दर्जेदार सुविधा देण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, अद्यापही जलतरण तलावाचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जलतरण खेळाडू व इतर विद्यार्थी, नागरिकांना जलतरण तलाव सुरू होण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार हे अनिश्चित आहे.