दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । पोलादपूर । २२ जूलै रोजी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे भुसख्खलन होत दरड कोसळली होती. या दर्घटनेत साखर सुतारवाडीतील २३ घरे जोत्यासह वाहुन गेली होती तर पाच व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला होता. सहा महिने उलटलेल्या या काळरात्रीत अनेकांच्या संसाराची वाताहत होताना पुंजी पुंजी जमवून साठवलेला दागदागिन्यांसह पैसा अडका वाहून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सामाजिक संस्था, सर्व पक्षीय नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या तातडीच्या मदतीने महाड-चिपळूण यांच्यासह हे गावसुद्धा सावरले, परंतू पै पै जमा करून भविष्यात उपयोगात येईल या आशेने पदरच्या हरवलेल्या दागदागीण्यांचे दुःख आपत्तीग्रस्त विसरु शकत नव्हते.
पोलादपूर तालुक्यातील शिवसेनेचे युवानेतृत्व अनिल मालुसरे यांनी साखर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आमदार भरतशेठ गोगावले, रायगड जि प उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहीरे, ग्रामपंचायत सरपंच पांडूरंग सुतार यांच्या माध्यमातून तहसीलदार पोलादपूर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मातीचा ढीगारा उपसण्याच्या कामास प्रशासकीय पातळीवर आदेश मिळवून कामाला सुरूवात केली असता संपूर्ण घर वाहुन गेलेले लक्ष्मण नारायण सुतार यांच्या पत्नीचे काही दागीने ढिगाऱ्याखाली सापडले. सरपंच व काही जबाबदार ग्रामस्थानी सदर बाधीत कुटूंबाच्या ते स्वाधीन केले असता त्या कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अजूनही एका चव्हाण कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागीने यावेळी पुर्णपणे वाहुन गेलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली सापडावेत अशी सर्व ग्रामस्थांनी भावना बोलून दाखवली. नुकताच साखरपुडा झालेल्या या मुलीच्या लग्नाची जबाबदारी त्याचवेळी जुलैमध्ये स्वीकारून महाड येथील ज्येष्ठ सामाजिक दिलीप जाधव साहेब यांनी चव्हाण कुटुंबाला धीर दिला आहे.