स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२३: पुढील वर्षी होणारी जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकीसाठीची जेईई मुख्य परीक्षा (प्रवेश परीक्षा) सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते.
आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती देताना पोखरियाल म्हणाले, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा निर्णय सरकारने आणलेल्या नव्या शिक्षण धोरणाला पुढे घेऊन जाईल. ज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल.’
शिक्षण मंत्री म्हणाले, ‘सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेत आणखी जास्त गुण मिळवण्यास मदत होईल. प्रादेशिक भाषांमध्ये जेईई परीक्षा घेतल्याने मेरिटमध्ये वाढ होईल. तसेच भाषेच्या अडचणीमुळे जे विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकत नव्हते ते आणखी चांगले गुण मिळवण्यात सक्षम होतील.’