स्थैर्य, मुंबई, दि.०३: जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु असून या महाविद्यालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या कामाला गती देणे आवश्यक असून या आठवड्याच्या शेवटी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी विस्तारीकरणासंदर्भातील विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) वैद्यकीय संचालनालयाला सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
जळगाव आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील आढावा बैठक आज ऑनलाईन पद्धतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जळगाव आणि चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.
श्री देशमुख म्हणले, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने विस्तारीकरणासंदर्भातील विस्तृत प्रकल्प आराखडा लवकर सादर करावा. हा आराखडा वैद्यकीय संचालनालयास सादर केल्यानंतर संचालनालयाने त्याचा परिपूर्ण अभ्यास करावा. या आराखड्यात महाविद्यालय उभारणीसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ, जागेची उपलब्धता यांच्यासह वैद्यकीय उपकरणे आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा याचीही परिपूर्ण माहिती द्यावी. संचालनालयाने याबाबत अभ्यास केल्यानंतर पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक लावण्यात येईल.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्यावी
चंद्रपूर येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. मार्च २०२२ पर्यंत हे काम कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याच्या माहितीचा एक अहवाल तातडीने संचालनालयास सादर करण्यात यावा. संचालनालय याचा अभ्यास करून या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेईल.