स्थैर्य, कोळकी, दि. 18 : कोळकी (ता.फलटण) मधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न जसा ऐरणीवर आला, तसाच कुचकामी प्रशासनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रश्नातून प्रभावीपणे मार्ग काढण्याची जबाबदारी शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाचीच आहे. या जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनाने काम केले पाहिजे, अशी चर्चा सध्या कोळकीमध्ये सुरु आहे.
गावातील मोकाट कुत्र्यांबद्दल वेळोवेळी चर्चा होते आणि ती हवेतच विरते. त्या चर्चेची काहीच फलनिष्पत्ती निघत नाही. चर्चेचे गुर्हाळ चर्चेतच संपते. कुत्र्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्याचे समाधान ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना मिळते, तर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे कर्तव्य बजावल्याचे समाधान अधिकार्यांना मिळते. त्याच्या पुढे काहीच होत नाही. कोळकी गावामध्ये शेकडो मोकाट कुत्री आहेत. कुत्र्यांची वाढती संख्या व त्यावर केले जाणारे उपाय यात मोठी तफावत आहे. मुळात मोकाट कुत्र्यांची समस्या सामान्य नागरिकांची समस्या आहे, असे ग्रामपंचायत प्रशासनाला वाटते का ? हाच खरा प्रश्न आहे. प्रचंड गतीने विस्तारणार्या कोळकीमध्ये मोकाट कुत्रे पकडण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सक्षम यंत्रणाच नाही. कुत्रे पकडण्यासाठीच्या गेल्या काही वर्षापासून चर्चा सुरू आहे, पण अद्याप त्या बाबत व्यवस्था केलेली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया व लसीकरण करून सोडून दिले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे मोकाट कुत्रे पकडण्याचा काहीच परिणाम होत नाही. कुत्रे मारण्याची परवानगी नसल्यामुळे पकडलेले कुत्रे सोडून द्यावे लागते. सोडून दिलेले कुत्रे पुन्हा त्याच भागात दहशत निर्माण करते. हे दुष्टचक्र संपण्यासाठी ग्रामपंचायतीला ठोस कार्यवाही करावी लागणार आहे. केवळ चर्चा करून आणि चर्चेमधून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देऊन चालणार नाही, असे मत कोळकीकर बोलून दाखवत आहेत.
कुत्रे पकडण्याची यंत्रणा जशी कमकुवत आहे तशीच कोळकी परिसरातील सार्वजनिक साफसफाईची परिस्थितीही गंभीरच आहे. दिवसेंदिवस पडून राहणारा कचरा कुत्र्यांच्या टोळ्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. मोकळ्या प्लॉटमध्ये पडणार्या घाणीमधून आजूबाजूलाच कुत्र्यांचा वावर असतो. याशिवाय अनेक ठिकाणी फेकण्यात आलेले हॉटेल्समधील शिल्लक अन्न हे कुत्र्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. कचरा आणि उघड्यावरची अन्न यावर ग्रामपंचायतीने कठोरपणे निर्बंध घातले तर मोकाट कुत्र्यांवरही निर्बंध बसेल. ग्रामपंचायत प्रशासनाला कुत्रे पकडण्यात अपयश येत असल्याचा टाहो फोडत बसण्यापेक्षा कुत्रे पकडण्याची मोहीम कशी प्रभावीपणे होऊ शकेल, याकडे लक्ष दिले तर नागरिकांना दिलासा मिळेल.
कोळकीमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर नागरीवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसुन येत आहे. आगामी काळामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोळकीमधील मोकाट कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
– सचिन रणवरे,
पंचायत समिती सदस्य
कोळकी गावच्या नागरी वस्तीमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसुन येत आहे. आगामी काळामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठोस पावले उचलणार आहे. कोळकी मधील मोकाट कुत्र्यांच्यामुळे जेष्ठ नागरिकांसह बालक व महिलांनाही त्रास होत आहे.
– संजय कामठे,
उपसरपंच, कोळकी ग्रामपंचायत