स्थैर्य, जळगाव, दि. ६: येथील जिल्हा कारागृहातील वाढती बंदी संख्या लक्षात घेता भुसावळ येथे दर्जा 1 चे जिल्हा कारागृह होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा कारागृह येथून गेल्या महिन्यात कैद्यांनी केलेल्या पलायनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा कारागृहास अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा कारागृह अधिकारी पी. जे. गायकवाड, वरिष्ठ तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी उपस्थित होते. याप्रसंगी कारागृहात कैद्यांना द्यावयाच्या विविध सोयी सुविधा, मागील संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, कारागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे या व अन्य अत्यावश्यक सुविधांसह कारागृहातील कोविड पॉझिटिव्ह कैद्यांसाठी स्वतंत्र वैद्यकीय तपासणी व उपचार खोली उपलब्ध करून जिल्हा कारागृहात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास व जिल्हा कारागृह प्रशासनास दिल्या. त्याचबरोबर कारागृहातील स्वच्छता, शिस्त याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वखर्चाने कैद्यांच्या रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक भांडी जिल्हा कारागृहाला भेट दिली.
जिल्हा कारागृहाची स्थापनेवेळी (58 वर्षापूर्वी) असलेली अधिकृत बंदी संख्या ही 200 होती. आता याठिकाणची बंदी संख्या वाढली आहे. क्षमतेच्या दुपटीपेक्षा अधिक म्हणजे 442 बंदी सध्या कारागृहात दाखल असल्याने त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये तसेच जळगाव कारागृहातील बंदी संख्या कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. जळगाव जिल्हा कारागृह येथे नवीन बांधकाम करण्यास अतिरिक्त जागा उपलब्ध नाही. भुसावळ येथे 20 एकर जागा उपलब्ध असून तेथे जिल्हा कारागृह वर्ग 1 नव्याने निर्माण करणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असून लवकरच भुसावळ येथील नवीन कारागृहाच्या निर्मितीसाठी मी स्वत: प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक विष्णू भंगाळे, पं. स. सभापती नंदलाल पाटील, रवी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुभाष राऊत, प्रशांत सुरळकर, माळी आदि उपस्थित होते.