कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि.१३:  कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरीदेखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना टेस्टिंग आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला, निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती उपाययोजना व विकास कामांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नपा गटनेते प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे,  मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपअभियंता उन्मेष पाटील, जनार्दन फुलारी, तालुका पोलीस निरिक्षक अनिल भवारी, येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना व कोरोना तपासणी नियमित सुरू ठेवावी. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत उपाययोजना कायम सुरू ठेवाव्यात. तसेच रुग्ण संख्या कमी झाली म्हणून गाफील राहू नये अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटला तातडीने स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे असे आदेश दिले.

भविष्यात येवला शहरात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असल्यास पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने साठवण तलावाचे नियोजन करण्यात यावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छता, गटार सफाई यासह आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना केल्या.

शेतकऱ्यांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात पीक कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना केल्या. तसेच वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावी असे आदेश दिले.

रखडलेली लोकोपयोगी कामे लवकरात लवकर पूर्ण करा

येवला दौऱ्यावर असताना आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहर व तालुक्यात रखडलेल्या कामांची अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. यावेळी येवला शहरातील शादिखाना, वाचनालय, पर्यटन विकास कामे, येवला शहर सुशोभीकरण, रस्ते यासह रखडलेली लोकउपयोगी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टीच्या जागेची पाहणी

येवला शहराच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या येवला शिवसृष्टी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदादेखील काढण्यात आली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसृष्टी जागेची पाहणी करून याठिकाणी करावयाच्या कामांबाबत नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!