दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी काम सुरू केले आहे. सरकारला साथ देण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीतर्फे युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेला उपक्रम स्वागतार्ह असून तो गावोगाव पोहोचवावा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रकोष्ठतर्फे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रकोष्ठ संयोजक डॉ. शुभा पाध्ये व सहसंयोजक विनय त्रिपाठी उपस्थित होते.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, युवती प्रशिक्षण घेऊन स्वतःचे स्वतः संरक्षण करू शकतात. त्यासाठी भाजपाच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रकोष्ठने स्वागतार्ह उपक्रम सुरू केला आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढणे आवश्यक आहे. प्रकोष्ठने हा उपक्रम राज्याच्या सर्व भागात प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवावा. पक्ष संघटना त्यासाठी पाठबळ देईल.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जगभर मान्यता मिळाली आहे. त्यांच्यामुळे सर्व देशात भारतीय पासपोर्टला महत्त्व आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी निवडणुकीत मतदान करण्याची गरज आहे. त्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवतींनी मतदार नोंदणी अवश्य करावी. स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाच्या मोहिमेसोबत नवमतदारांच्या नोंदणीची मोहीमसुद्धा सुरू केली पाहिजे.