
दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । फलटण । नवी मुंबईतील नेरुळ येथे राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकारातून प्रसारमाध्यमांसाठी सुरु होणार्या माहिती भवनला मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यानुसार सदर ठिकाणी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याला अनुसरुन सदरची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
या ‘माहिती भवन’ च्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालन उभे राहत असल्याबद्दल शासनास धन्यवाद देवून सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून मराठी व इंग्रजी अशा संमिश्र भाषेतल्या पहिल्या ‘मुंबई दर्पण’ या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि.6 जानेवारी 1832 रोजी केली. तसेच ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी भाषेतील मासिकाचीही सुरुवात त्यांनीच मुंबईतून दि.1 मे 1840 रोजी केली. तसेच सन 1812 ते 1846 या काळात शिक्षण, संशोधन, समाजप्रबोधन आदींच्या माध्यमातून त्यांचे मुंबईतून महाराष्ट्रासाठी, देशासाठी प्रचंड योगदान आहे. परंतु या एव्हढ्या कर्तृत्त्ववान महापुरुषाचे मुंबई महानगरीत अद्यापपर्यंत काहीही स्मारक नाही. तथापि, मुंबई या बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक व्हावे यासाठी राज्यशासनाच्या या माहिती भवनचे ‘‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर माहिती भवन’ असे नामविस्तारीकरण तातडीने करावे.
तसेच सदर भवनमध्ये दर्शनी भागात बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धपुतळा किंवा लाईफ साईज पोट्रेट व त्याच्या एका बाजूला ‘दर्पण’ या पहिल्या वृत्तपत्राचे व दुसर्या बाजुला ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी मासिकाचे मुखपृष्ठ व पहिल्या अंकाचे डिजीटल पद्धतीने छायाचित्र लावण्यात यावे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या चरित्र कार्यावर आधारित माहितीपट, मराठी वृत्तपत्रसृष्टीवर आधारित लघुपट तयार करुन त्याचे प्रदर्शन मोठ्या स्क्रिनवर करण्यासाठी किमान 100 आसनाचे सुसज्ज सभागृह बांधण्यात यावे. या सभागृहाच्या आतील भिंतीवर मराठी वृत्तपत्रसृष्टीतील ख्यातनाम प्रसिद्ध अशा प्रभावशाली संपादकांची तैलचित्रे लावण्यात यावीत. राज्यातील मराठी वृत्तपत्रांचे जिल्हानिहाय प्रदर्शनही याठिकाणी डिजिटल पद्धतीने संकलित करण्यात यावेत. येथील भव्य अशा ग्रंथालयात ख्यातनाम संपादकांची चरित्रे, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील प्रसारमाध्यम, आधुनिक तंत्रज्ञान, माहिती यावरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेखकांचे / ग्रंथकारांचे संदर्भ ग्रंथ इत्यादींचा समावेश व संदर्भ अभ्यासासाठी आधुनिक पद्धतीची अभ्यासिका असावी, अशी अपेक्षाही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनाची प्रत माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री ना.अदिती तटकरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना पाठवण्यात आली असून बाळशास्त्रींच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेवून शासनाने राज्यातील पत्रकारांच्यावतीने करण्यात आलेली संस्थेची ही प्रातिनिधीक मागणी तातडीने मान्य करावी, असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, बापूसाहेब जाधव, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी स्पष्ट केले आहे.