
स्थैर्य, फलटण, दि. १८ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यात सिद्धाली शहा यांनी पुन्हा एकदा संपूर्ण प्रभाग पिंजून काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या या ‘मॅराथॉन’ जनसंपर्क मोहिमेला प्रभागातील अबालवृद्धांकडून आणि महिलांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिवर्तनाचे वारे स्पष्टपणे वाहताना दिसत आहेत.
प्रभागातील या फेरीत सिद्धाली शहा यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. विशेष म्हणजे, या प्रभागात केवळ नगरसेवक पदासाठीच नव्हे, तर भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनाही मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. “नगराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक एकाच विचाराचे आणि विकासाभिमुख असावेत,” या भावनेतून प्रभाग ८ मधील नागरिक समशेरसिंह आणि सिद्धाली शहा या जोडीला पसंती देत आहेत.
निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताना एक महत्त्वाची बाब समोर येत आहे ती म्हणजे विरोधकांची स्थिती. सिद्धाली शहा यांच्या विरोधात असलेल्या उमेदवार यापूर्वी सुद्धा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या मागील कार्यकाळात प्रभागात कोणतेही ठोस आणि उल्लेखनीय विकासकाम झाले नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. विद्यमान असूनही ‘विकासकामांचा अभाव’ हा मुद्दा विरोधकांसाठी अडचणीचा ठरला आहे.
दुसरीकडे, सिद्धाली शहा यांचा उच्चशिक्षित चेहरा, अनुप शहा यांच्या माध्यमातून झालेली पूर्वपुण्याई आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यामुळे मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकला आहे. “ज्यांनी संधी मिळूनही काम केले नाही, त्यांना पुन्हा संधी देण्यापेक्षा, काम करण्याची धमक असलेल्या नव्या रक्ताला संधी देणे योग्य,” अशी चर्चा प्रभागात रंगली आहे.
विरोधकांच्या या निष्क्रियतेमुळे आणि भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे कु. सिद्धाली अनुप शहा यांचा विजय सुकर मानला जात आहे. मतदारांचा मिळणारा वाढता प्रतिसाद आणि विरोधकांवरील नाराजी पाहता प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपचा झेंडा फडकणार, हे आता निश्चित मानले जात आहे.
