‘गुंजन’ आणि ‘मधुमालती’ या शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । पुणे । मीडिया वर्क्स स्टुडिओ, पुणे प्रस्तुत आणि श्री. व्यंकट मुळजकर निर्मित “गुंजन” आणि “मधुमालती” या प्रासादिक, भावगंधित शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पुण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच हे दोन्ही अल्बम म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ नेते माननीय उल्हास दादा पवार हे होते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी शब्द स्वरमालेचे रसग्रहण केले. या कार्यक्रमात दोन्ही ध्वनिमुद्रिकेच्या गीतकार सुवर्णा मुळजकर व संगीतकार आनंदी विकास यांची विशेष उपस्थिती होती.

‘गुंजन’ आणि ‘मधुमालती’ या दोन्ही ध्वनिमुद्रिकेचे संगीत हे आनंदी विकास यांचे असून यामध्ये पं. शौनक अभिषेकी, अंकिता जोशी, मंगेश बोरगावकर, शरयू दाते, स्वराली जोशी, सौरभ दप्तरदार, मयुरी अत्रे आणि विश्वास अंबेकर यांनी रचना गायल्या आहेत. या दोन्ही अल्बमचे निर्माते श्री व्यंकट मुळजकर आहेत.

निर्माते व्यंकटेश मुळजकर या कार्यक्रमाविषयी सांगतात,”‘गुंजन’ हा भक्तीगीताच्या संदर्भातील तर ‘मधुमालती’ हा भावगीता संदर्भातील गीतसंग्रह रसिकप्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. अतिशय खेळीमेळीचा व ऋद्यस्पर्शी असा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांनी लावलेली उपस्थिती. मला या कार्यक्रमाची निर्मिती करून प्रचंड आनंद झाला. मीडियावर्क्स स्टुडिओचे आदित्य देशमुख, मंगेश बोरगावकर आणि डॉ.सुजित शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुरेख केले. सर्वांनी कविता आणि संगीत यांची जोड झाल्यानंतर ते पुढे किती प्रभावी होतं, तसेच सध्याच्या काळामध्ये मराठी संगीताला, मराठी साहित्याला या कार्यक्रमांची किती गरज आहे. याचं प्रतिपादन यातून केले. या अल्बममधील गाणी सर्व प्रेक्षकांना आवडतील याची मला खात्री आहे.”

 


Back to top button
Don`t copy text!