दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे जागतिक महिला दिनानिमित्त दि. २ ते ८ मार्च या कालावधीत महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थीनी, प्राध्यापिका व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांच्या साठी राबविण्यात आले. पहिल्या दिवशी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने योगा व मेडीटेशन शिबीर घेण्यात आले. योग शिक्षिका राधिका नाळे यांनी मार्गदर्शन केले. विविध योगाचे प्रकार व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून महत्व सांगितले. दुसऱ्या दिवशी महिलांना त्यांचे हक्क व अधिकार याबाबत अधिक माहिती देताना अड. शिरीन शहा यांनी भारतीय संविधानात महिलांसाठी कोणते कायदे आहेत याबाबत माहिती दिली.
तिसऱ्या दिवशी लायन्स क्लब फलटण यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रामुख्याने हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, आर.बी.सी., डब्ल्यु.बी.सी. या तपासण्या केल्या गेल्या. चौथ्या दिवशी शाश्वत उद्यासाठी आजची स्त्री पुरुष समानता या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, स्पर्धा पाहण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. पाचव्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत निर्भया पथकाने महिलांना समाजामध्ये वावरताना आणि मोबाईल वापराबाबत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले स्वसंरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना बाबतची प्रात्यक्षिके घेतली. सहाव्या दिवशी सप्ताहाच्या सांगता प्रसंगी महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मेधा कुमठेकर यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी महिलांनी आपले, कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचे आरोग्य राखण्यात महत्वाचा वाटा उचलावा, जेणेकरुन महिला सक्षमीकरणाची गरजच पडणार नाही असे उद्बोधन केले. सुरक्षितता आणि सुव्यवस्था हे दोन निकष, स्त्री जेथे काम करत आहे तेथे पाळले पाहिजेत. एकदा जर घरगुती आणि सामाजिक सुरक्षा स्त्रीला लाभली की ती पुरुषाच्या बरोबरीने पुरुषा एवढेच काम करु शकते. मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्री कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करु शकते. स्त्रियांनाही योग्य तो सन्मान आणि शक्ती प्राप्त करता येईल. खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सक्षम महिलांनी उपेक्षित महिलांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नांची दिशा वळविणे ही खरी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची प्रेरणा ठरेल असे त्या म्हणाल्या. आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे एखादी महिला कशी ठामपणे उभे राहू शकते याबाबतचे प्रेरणादायी उदाहरण महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत तक्रार निवारण समितीने केले होते रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. महिला सप्ताह ही नवीन संकल्पना यशस्वीपणे राबविल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम यानी आयोजकांचे अभिनंदन केले.