
दैनिक स्थैर्य । 16 मार्च 2025। सातारा ।आदर्श राजकर्त्या म्हणजे अहिल्यादेवी. अहल्यादेवींनी आयुष्यात पंचमहायज्ञ व्यवस्था अंगिकारली होती. त्यांनी राज्यात शांतता निर्माण केली होती. आदर्श कर व्यवस्था, उत्तम अर्थव्यवस्था राबवून प्रजेला सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करून त्यापध्दतीने आचरण करणारी भारताची आदर्श सम्राज्ञी म्हणजे अहल्यादेवी होळकर होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका श्रीमती दिपालीताई पाटवदकर यांनी केले.
येथील पोलिस करमणूक केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने येथील राष्ट्रसंवर्धन संस्थेच्यावतीने जागर अहिल्येचा या विषयावर त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघचालक डॉ. अभय देशपांडे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. प्रियाताई शिंदे होत्या.
यावेळी राष्ट्रसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लेले, सहसंघचालक अॅड. नितीन शिंगटे, समरसता गतिविधी प्रांत सहसंयोजक मुंकुंदराव आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, तरुण व्यावसायिक जिल्हाप्रमुख श्रीधर कुलकर्णी, अॅड. सौ. शुभांगी काटवटे, नगरसेवक विजय काटवटे, सौ. वृंदा शिवदे, सौ. आसावरी इनामदार, सौ. मृणालिनी कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती दिपालीताई पाटवदकर म्हणाल्या, अहिल्यादेवींनी राज्यकर्ती कशी असावी, राज्यकारभार कशाप्रकारे आदर्श करावा हे स्वत:च्या कृतीतून दाखवून दिले. पंचमहायज्ञ व्यवस्था अहल्यादेवींनी कशाप्रकारे अंगिकारली हे दिपालीताईंनी उदाहरणासह सांगितले.
त्या म्हणाल्या, अहल्यादेवींनी भारताच्या वेगवेगळ्या भागात असंख्य मंदिरे बांधून त्याची उत्तम व्यवस्था राखली. देशातील नद्याच्या सभोवताली घाट बांधले. नदीची स्वच्छता ठेवली होती. अहल्यादेवी या अत्यंत धार्मिक होत्या. अहल्यादेवी पहाटे उठून स्वत: देवपूजा करत, पुराणश्रवण करत असत. नर्मदा नदीचे रोज दर्शन करत. तसेच अशाप्रकारचे धार्मिक विधी करण्यास इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. त्यांनी अनेक विद्वानांना राज्यात बोलावून त्याची राहण्याची व्यवस्था केली. राज्यात संस्कृत पाठशाळा उभारल्या. अनेक ठिकाणी भागवत सप्ताह केले. राज्यात प्रशस्त रस्ते बांधले. मंदिरा सभोवताली तसेच रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केले. प्रजादक्षहितवादी राज्यकर्ती म्हणून अहल्यादेवींनी नावलौकिक मिळविला.
श्रीमती दिपालीताई पाटवदकर म्हणाल्या, देशात अनेक ठिकाणी तलाव बांधले. शेतकर्यांना सार्वजनिक ठिकाणी तसेच स्वत:च्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित केले. शेतकर्यांना मदत केली. अहिल्यादेवींनी आपले आई वडील यांची सेवा केलीच परंतू सासू सासरे यांचीही सेवा करून पितृयज्ञ कशाप्रकारे करतात हे कृतीतून दाखवून दिले. लोकसेवा ही त्यांच्या ठायी अंगीकारली होती.
अहल्यादेवींनी केदारेश्वरपासून रामेश्वपर्यंत देशाच्या अनेक भागात अन्नछत्रे उघडली. अन्नछत्राबरोबरच राहण्यासाठी उत्तम धर्मशाळा उभारल्या. प्रत्येक धर्मशाळेत व अन्नछत्राच्याठिकाणी त्यांनी तुळशी वृंदावन उभारून हिंदूसाठी सुरक्षित आश्रयस्थाने निर्माण केली. मंदिरांच्या, धर्मशाळेच्या बांधकामांसाठी राजस्थानमधून असंख्य कारागीरांना बोलाविले. सैनिकांच्या विधवा पत्नी, तसेच महिलांसाठी छोटे मोठे उद्योधंदे उभारून रोजगार उपलब्ध केला. महिलांना वेगळी कौशल्य प्राप्त होण्यासाठी विविध केंद्रांची स्थापना राज्यात केली.
अहिल्यादेवींनी राज्यात अनेक ठिकाणी गोशाळा उभारल्या. गायींचे रक्षण केले. त्याच्या चार्याच्या व्यवस्थेसाठी शेकडो एकर गायराने निर्माण केली. पशूपक्षांसाठी राखीव वने निर्माण केली. त्यांनी तुरुंगातील कैद्यांना सुध्दा वेळेवर जेवण उपलब्ध करून दिले. अशाप्रकारची पंचमहायज्ञ व्यवस्था अहल्यादेवींनी राज्यात निर्माण केली होती.
डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, अहल्यादेवी देशातील प्रजादक्षहितवादी राज्यकर्ती होत्या. अहल्यादेवींचे कार्य व त्यांचे विचार सध्याच्या काळात उपयोगी पडत आहेत. आजच्या राजकर्त्यांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
डॉ. सौ. केतकी भिडे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. आसावरी इनामदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अहल्यादेवींविषयी गीत सादर करण्यात आले. वंदेमातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान व्याख्यानाअगोदर राष्ट्रसंवर्धन संस्थेच्यावतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत 500 महिला सहभागी झाल्या होत्या.