दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । फलटण । महिला दिनानिमित्त फलटण महिला विकास मंडळाने व बियॉंड एंटरटेनमेंट, पुणे यांनी सादर केलेला लता मंगेशकर यांच्या मराठी गीतांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका व सिनेसमीक्षक सुलभा तेरणीकर यांनी स्त्री शक्तीचे खरे रुप दीदींच्या जीवनपटातून उलगडून दाखविले.
दीदींचा बालपणापासूनचा वाटचालीचा खडतर प्रवास, वडिल दीनानाथांनी केलेले संस्कार, वयाच्या 5 व्या वर्षापासुन केलेली संगीत साधना हा प्रवास अत्यंत ओघवत्या शैलीत सुलभाताईंनी वर्णन केला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दीदींच्या या प्रवासाला नम्रपणे अभिवादन केले. फलटणचे ज्येष्ठ निवृत्त अभियंता उस्मान शेख यांनी चित्रफितीद्वारे दाखविलेल्या गाण्यांनी महिलांना पूर्वीच्या काळाची आठवण करून दिली.
महिला दिनानिमित्त आयोजित केलेला महिला विकास मंडळाचा हा पहिलाच कार्यक्रमी होता. मंडळाची स्थापना डिसेंबर मध्ये झाली. अनेक महिलांनी सभासद होण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले व हा कार्यक्रम घेण्यात सर्वांनी हिरिरीने मदत केली.
मंडळाच्या मार्गदर्शिका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर व कार्यक्रमाच्या नियोजनात प्रामुख्याने सहभागी असणार्याब ‘व्यक्तिमत्व’ च्या प्रकाशिका सौ. गीतांजली गायकवाड, उद्योजिका सुपर्णा अहिवळे शिक्षण क्षेत्रातील कल्पना जाधव यांच्या कुशल नेतृत्वाने व अर्चना करवा, प्राची थोरात, सुमित्रा इंगळे, पूनम अहिवळे व मनिषा कांबळे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
सुलभा तेरणीकर व उस्मान शेख यांचा सत्कार श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन रेखा खिलारे यांनी केले. अनुबंध कला मंडळाचे सर्व पदाधिकारी, फलटण येथील बहुसंख्य महिला यांच्या उपस्थितीने हॉल पूर्ण भरला. ‘सुरेख कार्यक्रम’ हे उद्गार कार्यक्रमानंतर ऐकण्यास मिळाले.