“हुनर हाट” महोत्सव सप्टेंबर 2020 पासून पुन्हा होणार सुरु, “स्थानिक ते वैश्विक” ही यंदाची संकल्पना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


हुनर हाट, देशाच्या कानाकोपऱ्यातील कारागिरांना, त्यांच्या कौशल्य व हस्तनिर्मित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, या स्वदेशी वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी ही विशेष नाममुद्रा अर्थात ब्रँड निर्माण केला आहे- मुख्तार अब्बास नक्वी

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी सुरु आहे. अशावेळी स्वच्छता, निर्जंतुकीकरण साहित्यासह विविध उत्पादनांना हुनर हाटमधे स्थान दिले जाणार- मुख्तार अब्बास नक्वी

हुनर हाटमधे “जान भी जहान भी” हे विशेष दालन असणार आहे. यात “घाबरु नका खबरदारी बाळगा” असा संदेश देणारी जनजागृती केली जाईल- मुख्तार अब्बास नक्वी

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 : “हुनर हाट” मधे सुरक्षित अंतर राखणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, मास्क आदी आवश्यक साधनांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना आव्हानाच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच महिन्यांनंतर हस्त – शिल्प कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी “हुनर हाट” महोत्सव सप्टेंबर 2020 पासून पुन्हा सुरु होतोय. तो ही पहिल्यापेक्षा अधिक सक्षमतेने. यात कारागिरांचा अधिक सहभाग राहाणार असून यंदाची संकल्पना आहे “स्थानिक ते वैश्विक”.

गेल्या पाच वर्षात देशभरातील पाच लाखांहून अधिक हस्तनिर्मित वस्तूंच्या कारागिरांना हुनर हाटमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही स्वदेशी उत्पादने विलक्षण लोकप्रिय झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज इथे दिली. देशभरातील दुर्गम ते सगळ्याच भागातील कारागिरांना, त्यांच्या कौशल्य व उत्पादनांना यामुळे बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हुनर हाट, स्वदेशी हस्तनिर्मित वस्तुंची खरीखुरी नाममुद्रा अर्थात ब्रँड झाला आहे, असे नक्वी म्हणाले.

इंडिया गेट येथे फेब्रुवारी 2020 मधे भरलेल्या हुनर हाटमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक उपस्थिति लावून कारागिरांचे मनोबल वाढवले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. पंतप्रधान मोदी यांनी “मन की बात” मध्येही  “हुनर हाट” मध्ये मांडलेल्या स्वदेशी उत्पादने तसेच कारागिरांच्या कामाची प्रशंसा केली होती. ते म्हणाले होते, ” काही दिवसांपूर्वी दिल्लीतील हुनर हाटमध्ये एका छोट्याशा जागेत मी आपल्या देशाची विशालता, संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती व भावभावनांचे दर्शन केले. संपूर्ण भारतातील कला, संस्कृतीची झलक खरच अनोखी होती. यामागे कारागिरांची साधना, चिकाटी, परिश्रम व आपल्या कौशल्याप्रती प्रेमाची अनुभूती स्पष्टपणे दिसून येत होती. हे सारेच प्रेरणादायी आहे.”

“हुनर हाट, आपली कला सादर करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ तर आहेच, सोबत त्यांच्या स्वप्नांना पंखही प्रदान करत आहे. हे एक असे ठिकाण आहे जिथे आपल्या देशातील वैविध्य बघणे टाळता येणार नाही, ते अशक्यच आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते.

येथे शिल्पकला तर आहेच सोबतीने आपल्या खाद्यसंस्कृतीतील वैविध्यही आहे. एकीकडे  इडली-डोसा, छोले-भटूरे, दाल-बाटी, खमन-खांडवी यासारखी कितीतरी व्यंजने होती. मी स्वतः बिहारमधल्या स्वादिष्ट लिट्टी चोखाचा पुरेपूर आस्वाद घेतला.

भारतातील प्रत्येक भागात असे मेळावे, प्रदर्शन, महोत्सवांचे आयोजन होत असते.

भारत जाणून घेण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी संधी मिळेल तेव्हा अशा महोत्सवात जायला हवे. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ मनापासून अनुभवण्याची, वास्तवात ती जगण्याची ही संधी असते. आपण केवळ देशातील कला, संस्कृती यांच्याशी नाते जोडत नसता तर देशातील कष्टकरी, अस्सल कारागिरांच्या विशेषतः महिलांच्या समृद्धीतही आपले योगदान देऊ शकता.” असे पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नकवी यांनी माहिती दिली की, सध्या सुरु असलेल्या देशव्यापी टाळेबंदीतल्या वेळेचा सदुपयोग करत कारागिरांनी मोठ्या प्रमाणावर हस्तनिर्नित सुंदर वस्तू तयार केल्या आहेत. ‘हुनर हाट’ प्रदर्शनात त्या मांडल्या जातील. तिथे त्यांची जोरदार विक्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाद्वारे आतापर्यंत देशातील विविध भागात पंचवीस पेक्षा जास्त हुनर हाटचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखो कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. येणाऱ्या काळात मुंबई, चंडीगढ, दिल्ली, प्रयागराज, भोपाळ, जयपूर, हैदराबाद, गुरुग्राम, बेंगलुरु, चेन्नई, कोलकाता, देहरादून, पटना, नागपपूर, रायपूर, पुद्दुचेरी, अमृतसर, जम्मू, शिमला, गोवा, कोची, गुवाहाटी, भुवनेश्वर, अजमेर, अहमदाबाद, इंदूर, रांची, लखनऊ आदि ठिकाणी “हुनर हाट” चे आयोजन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी “हुनर हाट” चे डिजिटल व ऑनलाईन प्रदर्शन देखील असणार आहे. त्यामुळे लोकांना हुनर हाट मधे ऑनलाईन खरेदीही करता येईल. “हुनर हाट” मधे कारागिर आणि त्यांच्या स्वदेशी हस्तनिर्मित उत्पादनांची “जेम” (गवर्नमेंट ई मार्केटप्लेस) मधे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय विविध निर्यातदार संस्था या कारागिरांच्या स्वदेशी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्यात रस घेत आहेत.

यामुळे या स्वदेशी कारागिरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊन चांगली आवक होऊ शकते. “हुनर हाट” पुन्हा सुरु होत असल्याने, देशातील कलांचा वारसा असलेल्या लाखो कारागिरांमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे नकवी म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!