दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । सातारा । पाडळी (ता.सातारा) येथे रविवारी रात्री घरांना भीषण आग लागली.प्रमुख चौकातच असणाऱ्या घरांना आग लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची झळ चार घरांना बसली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.रात्री उशिरा अग्निशामक दलाच्या चार गाड्याना ही भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले.या आगीत सुमारे १२.५० लाख रुपयांचे नुकसान झाले.
रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पाडळी गावात मुख्य चौकात असणाऱ्या एका घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले.एका मागोमाग एक अशी चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
या आगीची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरक्षक वर्षा डाळींबकर,सह्ययक फौजदार दीपक कराळे,हंबीर सावंत,राजू शिखरे,विजय साळुंखे,राजू शिंदे,अमोल गवळी,राहुल भोये,राहुल टोणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच आगीची माहिती मिळताच कराड नगरपालिका,सातारा नगरपालिका,जयवंत शुगर व अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने पाडळीत दाखल झाल्या.सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना आग संपूर्णपणे विझवण्यात यश आले. सोमवारी सातारा तहसीलदार आशा होळकर,नायब तहसीलदार दयानंद कोळेकर,मंडलाधिकारी पी.एल.गाडे व तलाठी डी.एफ.अंभोरे यांनी पाडळी येथे भेट देऊन जळीत पंचनामा केला.यामध्ये चंदन बाळासो ढाणे यांचे ६ लाख,मधुसूदन सदाशिव बाचल व संदेशकुमार सदाशिव बाचल यांचे ४ लाख,तानाजी परबती ढाणे यांचे २ लाख व मंगलदास दत्तात्रय बाचल यांचे ५० हजार असे सुमारे १२.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.