स्थैर्य,दि.१४: क्षुल्लक कारणावरून एका पोलिसाने आणि त्याच्या पत्नीने अल्पवयीन मुलीला गरम सळीचे चटके दिल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दांपत्यावर गुन्हा नोंदवला असून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या पोलिसाचं नाव नीतेश चौधरी असं आहे. बिहार येथील पुर्णिया जिल्ह्यातील रजनी चौक परिसरात राहणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक नितेश चौधरी यांच्याकडे ही अल्पवयीन मुलगी गेली दोन वर्षे घरकाम करत आहे. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. ती फार मस्तीखोर आहे. घरकाम करत असताना ती सतत माती टाकत असल्यामुळे पीडिता तिच्यावर ओरडली.
तिच्या फक्त ओरडण्यामुळे संतापलेल्या दांपत्याने तिला बेदम मारले. एवढेच नाही तर तिला लोखंडाच्या गरम सळीने गाल, गळा आणि दोन्ही हातांवर चटके दिले आहेत. ती ओरडत होती, विव्हळत होती पण या निष्ठूर दांपत्याला तिची दया आली नाही. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चटक्याच्या खुणा आहेत.
अखेर हिंमत एकवटून ही मुलगी शनिवारी घरातून पळाली. घरातून पळाल्यानंतर भट्टा बाजारात एका माणसाला तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानेही तिची लगेच मदत करत चाईल्ड लाईनशी संपर्क साधला. त्याच्या मदतीने ती चाईल्ड लाईन येथे पोहोचली. तिच्या शरीरावर चटके दिसत आहेत. ती प्रचंड घाबरलेली आहे. दोन वर्षांपूर्वी ती पूर्णियाला आली होती.
तिचा काका रंजीत कुमार याने मित्राच्या घरी शिक्षणासाठी ठेवेन, जिथे ती काम करता करता शिकेल, असं सांगून तिला पूर्णियाला आणलं होतं. शिकण्याच्या कारणाळे तिच्या आईनेही तिला पाठवायला होकार दिला. सुरुवातीचे काही महिेने असेच चांगले गेले. पण नंतर नंतर घरात बंद करून हे दांपत्य तिला मारहाण करायचे असे त्या मुलीने पोलिसांना सांगितले आहे.
मुलीच्या तक्रारीवरुन या दाम्पत्यावर मारहाण, शिवीगाळ केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिला अधिकाऱ्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या प्रभारी किरण बाला याप्रकरणी तपास करत असून दाम्पत्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याप्रकरणी नीतेश चौधरी यांचा धाकटा भाऊ दिवाकर चौधरी यांच्या म्हणण्याप्रमाणे हे दांपत्य तिला मुलीसारखं वागवत होतं. तिला मारहाण आणि चटके दिले या गोष्टी खोट्या आहेत. मुलीचे आई-वडील गरीब आहेत. त्यामुळे मुलीला शिक्षणासाठी इथे ठेवले होते. तिला शिकवायला एक शिक्षिकाही घरात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.