छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास प्रेरणादायी! : पालकमंत्री अब्दुल सत्तार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, धुळे, दि.०६:   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकीय व स्वकियांशी लढा देत महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. शिवराज्याभिषेक दिन स्वराज्याची, सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस असून त्याची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत आज शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे हे ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी शिवस्वराज्य गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, लोककल्याणकारी स्वराज्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. याच दिवशी 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व रायगडावरून घोषित झाले. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याला मराठी साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. रयतेच्या हिताच्या कारभाराचे हिंदवी स्वराज्य सर्वोत्तम उदाहरण आहे, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढीचे पूजन होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली. शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. गजेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!