कराड दक्षिणचा डोंगरी विभाग बंधार्‍यांमुळे सुजलाम-सुफलाम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कराड,  दि. 21 : कराड दक्षिण डोंगरी विभागात पिण्याचा व शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी माजी मंत्री विलासराव पाटील यांनी गाव तिथे बंधारे बांधल्यानेच हा विभाग सुजलाम सुफलाम झाला असल्याचे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.

कराड दक्षिण डोंगरी विभागाला वरदायी ठरलेला  येवती-म्हासोली मध्यम प्रकल्प तुडुंब भरला असून धरणातील पाण्याचे खणानारळाने ओटी भरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, ओगलेवाडी, कराडचे आबासाहेब शिंदे, अथणी-रयत साखर युनिटचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, माजी सभापती फरिदा इनामदार, पंचायत समितीचे सदस्य काशीनाथ कारंडे, प्रा. धनाजी काटकर, हरिभाऊ शेवाळे, येवतीचे माजी सरपंच सदाशिव शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, माथा ते पायथा अशी सिंचनाची शृंखला निर्माण केली. याबरोबर या विभागात गाव तेथे मोठा बंधारा ही संकल्पना पूर्ण झाल्याने या विभागाचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्‍न मिटवण्यात त्यांना यश आले. वारणा धरणातील वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून एक टीएमसी पाणी त्यांनी या विभागाला मिळवून दिल्याने या विभागातील सिंचनाचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटला आहे. यापपुढील काळात फक्त शासन व येथील शेतकर्‍यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही मंडळी प्रयत्नशील असून पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने भविष्यात प्रयत्नशील राहू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा. धनाजी काटकर म्हणाले, विलासकाकांनी या मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला असून डोंगरी विभागातील कुसळे म्हणून हिणवला जाणार्‍या या भागाला त्यांनी आज सुजलाम-सुफलाम करून टाकले आहे. फक्त विलासकाकांचे ऋण कराड दक्षिणेतील जनता कधीही फेडू शकत नाही. डोंगरी विभागातील प्रत्येक गावात पाण्याने अनेक बंधारे खचाखच भरले आहेत. पावसाचे पडणारे सर्व पाणी या विभागात अडवले जात असल्याने पाण्याची पूर्ण समस्या मिटली आहे. गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने वारणेच्याही पाण्याची येथील शेतकर्‍यांना गरज भासली नव्हती. यावर्षी ही सर्व धरणे तुडुंब भरल्याने वर्षभराची पाण्याची समस्या मिटली आहे. यापुढे आपण सर्व कार्यकर्त्यांनी काकांनी दिलेला विचार पुढे घेऊन जाणेसाठी उदयसिंह यांच्या पाठीशी राहून या विभागातील विकासाला अधिक चालना दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

उपअभियंता आबासाहेब शिंदे यांनी  स्वागत कारताना येवती प्रकल्पामुळे  2500 एकर क्षेत्र ओलिताखाली आले असल्याचे सांगितले. कोयना दूध संघाचे संचालक तानाजी शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी येवती, म्हसोली विभागातील प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी यांची  उपस्थिती होती.

कराड दक्षिण डोंगरी भागाला पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते. मात्र विलासकाकांनी या विभागात वारणा धरणाचे पाणी आणण्याबरोबर गाव तेथे बंधार्‍यांची, माथा ते पायथा अशी साखळी निर्माण करून सुमारे तीन टीएमसी पाण्याचा बफर स्टॉक निर्माण केला आहे. डोंगरी भागात मुबलक पाऊस झाल्याने हा स्टॉक भरला की येथील शेतकर्‍यांची कायमस्वरूपी चिंता मिटते. मुबलक पावसामुळे यावर्षी हा स्टॉक पूर्ण भरल्याने डोंगरी जनतेची पाण्याची चिंता मिटली असल्याची माहिती प्रा. काटकर यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!