स्थैर्य, दि.१: कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या हव्या त्या प्रमाणात चाचण्या होत नाहीयेत. त्यामुळे परत एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली आहे.
यात फडणवीस म्हणाले की, ‘चाचण्या वाढवण्यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करत असतानाही पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी संसर्ग कमी होणे सोडून तो अधिकाधिक वाढत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये आतापर्यंतच्या सह महिन्यांतील सर्वाधिक संसर्गाचा दर महाराष्ट्रात आढळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या 42 टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ 26 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये प्रतिदिन 37,528, ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन 88,209 चाचण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारकडून सुद्धा चाचण्या वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांसोबतच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपण चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार बोलून दाखविला. तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येते.’
‘राज्यातील प्रत्येक महिन्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. एप्रिल (8.04 टक्के), मे (18.07 टक्के), जून (21.23 टक्के), जुलै (21.26 टक्के), ऑगस्ट (18.44 टक्के), सप्टेंबर (22.37 टक्के). चाचण्या वाढविण्याचा परिणाम सुद्धा आपल्यासमोर आहे. ऑगस्टमध्ये 42 टक्के चाचण्या वाढविल्यावर संसर्गाचे प्रमाण 21 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आले होते. ते सप्टेंबरमध्ये 4 टक्क्यांनी वाढून आता 22.37 टक्के इतके झाले आहे. या एकट्या महिन्यात 12,079 लोकांना कोरोनामुळे प्राणास मुकावे लागले. आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. एकीकडे राज्यात थोड्या तरी अधिक संख्येने चाचण्या केल्या जात आहेत.’
‘मुंबईला अनेक उपनगरं जोडली आहेत. मुंबईतून कोकणात सुद्धा लोकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तेथे सुद्धा कमी चाचण्यांमुळे प्रादुर्भावाचा फटका बसतो आहे. पालघरमध्ये संसर्ग दर 28 टक्के, रायगडमध्ये 31 टक्के, रत्नागिरीमध्ये 20.1 टक्के, नाशिकमध्ये 27 टक्के, नगरमध्ये 27 टक्के, उस्मानाबादमध्ये 22.7 टक्के असा संसर्ग दर आहे. चाचण्या वाढविल्या जात नसल्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा रूग्णसंख्येत कितीतरी पटींनी वाढ होते आहे. भंडार्यात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रूग्णवाढ 663 टक्के, गोंदियात 496 टक्के, चंद्रपुरात 570 टक्के, गडचिरोलीत 465 टक्के इतकी आहे. मुंबईसह ज्या ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे, तेथे चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ त्वरित करण्यात यावी. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वाया जाणारा प्रत्येक दिवस हा भविष्यात आणखी मोठ्या समस्यांना आमंत्रण देणारा ठरेल, हे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. आपण त्यावर कारवाई कराल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.