दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२२ । वडूज । सुयोग लंगडे । सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला असून मागील टर्म प्रमाणेच या वेळेस सुद्धा चार अपक्ष निवडून आल्याने अपक्षांच्या हातीच नगरपंचायतीची सुकाणू राहणार आहे. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाच, भारतीय जनता पार्टीला सहा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एक, वंचित बहुजन आघाडीला एक तर चौघे जण अपक्ष मिळून १७ जण नगरपंचातीवर निवडून गेलेले आहेत.
वडूज नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणूक लढवत होते. यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून जयवंत माधवराव पाटील, बनाजी दिनकर पाटोळे, सौ. रेखा अनिल माळी, सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, सोमनाथ नारायण जाधव, ओंकार दिलीप चव्हाण यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे हे निवडून आलेले आहेत. तर त्यांच्या सोबत सौ. आरती श्रीकांत काळे, रोशना संजय गोडसे, सौ. स्वप्नाली गणेश गोडसे, सौ. शोभा तानाजी वायदंडे यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अभयकुमार विठ्ठलराव देशमुख हे निवडून आलेले आहेत. सौ. शोभा दीपक बडेकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने चंचू प्रवेश केला आहे. यासोबतच सौ. मनीषा काळे, सौ. राधिका गोडसे, सचिन माळी, मनोज कुंभार हे अपक्ष म्हणून वडूज नगरपंचायतीवर निवडून गेलेले आहेत.
बंडा गोडसेंना दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी तिकीट मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीची जवळीक साधली होती. मात्र त्या ठिकाणी त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले होते. प्रा. बंडा गोडसे यांनी आपल्या सुनबाई राधिका गोडसे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांनी विजयश्री खेचून आणत प्रा. गोडसे यांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
जनसंपर्क व विकासामुळेच सचिन माळी विजयी
वडूज नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ. शोभा माळी यांचे पती सचिन माळी यांना वडूजसह खटाव व माण तालुक्यातील अनेक दिग्गजांनी टार्गेट केलेले होते. परंतु माळी यांच्या जनसंपर्क व गेल्या पंचवार्षिक टर्ममध्ये केलेल्या विकासकामांमुळेच सचिन माळी हे निवडून आलेले आहेत.
विद्यमान नगरसेवकांसह प्रमुखांना पराभवाचा धक्का
निवडणूकीत विद्यमान नगरसेविका डॉ. निता गोडसे, मंगल काळे, शहाजी गोडसे, वचन शहा, नगरसेवक प्रदिप खुडे यांच्या पत्नी रोहिणी खुडे, निलेश गोडसे यांच्या पत्नी मेघा गोडसे, नगरसेविका सुषमा बोडरे यांचे पती दिपक बोडरे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. रंजना हणमंत खुडे, राजहंस नंदकुमार गोडसे, सुनिता अर्जुन गोडसे, स्मिता सोमनाथ येवले, कल्पना गडांकुश आदींना मतदारांनी पराभवाची धूळ चारली.