स्थैर्य, फलटण शहर ता. 25 : हिंगणगाव ता.फलटण येथील पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे.सदरचा पोल्ट्री फार्म बंद करावा यासाठी येथील ग्रामस्थ गेली १० वर्षे प्रशासनाशी लढा देत आहेत.मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने मनुष्य,पशु,पक्षी यांना जीवन जगणे असहय झाले आहे.सदरचा पोल्ट्री फार्म बंद करावा,अन्यथा २९ जून २०२० रोजी कंपनीच्या गेटवर बेमुदत धरणे सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आंदोलन करण्याचा इशारा हिंगणगाव ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी सातारा यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
हिंगणगाव ता.फलटण येथील सूळवस्ती येथे प्रिमियम चिकस् फिडस् प्रा.लि.पोल्ट्री फार्म आहे.पोल्ट्री फार्मच्या लगत ७०,उत्तरेस ८००,पश्चिमेस २०० अशी एकूण हजार,अकराशे लोक राहतात.या पोल्ट्री फार्ममधील कोंबडयांच्या विष्ठेमुळे हिंगणगावसह परिसरात दुर्गंधी पसरत आहे.यामुळे सतत मोठया प्रमाणावर माशा घोंघावत आहेत.त्यामुळे येथील लोकांचे सकाळ,संध्याकाळी जेवणे करणे कठीण झाले आहे,रात्री पुरेशी झोपही मिळत नाही.जनावरे दूधही देत नाहीत.अबाल वृध्दांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.त्यामुळे मनुष्य,पशु,पक्षी यांना जीवन जगणे असहय झाले आहे.येथील लोक गेली १० वर्षे मरण यातना सहन करत आहेत.परिणामी मानसिक व अर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
अशा स्थितीत हा पोल्ट्री फार्म बंद करावा यासाठी येथील लोक गेली १० वर्षे प्रशासनाशी लढा देत आहेत.मात्र प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहेत.प्रांताधिकारी,जिल्हा न्यायालय ते अगदीसर्वोच्च न्यायालयापर्यंत येथील लोकांनी लढा दिला आहे.
सदरची कंपनी ग्रामपंचायत,उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.तसेच कंपनीकडून तक्रारदारांवर दबाव आणला जात आहे.त्यामुळे कंपनीच्या हुकुमशाहीमुळे लोक तोंड धाबून बुक्याचा मार सहन करत आहेत.
हिंगणगाव परिसरातील जनता व पशुपक्षी यांच्या जिविताचा आणि निर्माण झालेल्या शेतीप्रश्नाचा विचार करून सदरचा पोल्ट्री फार्म बंद करावा आणि जनता व पशुपक्षी यांना नरक यातनेतून मुक्त करावे.अन्यथा २९ जून २०२० रोजी कंपनीच्या गेटवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे हिंगणगाव ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार, प्रांताधिकारी, हिंगणगाव ग्रामपंचायत, लोणंद पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत. त्यावर दत्तात्रय सूळ, रामचंद्र कारंडे, संजय सूळ, अक्षय नरूटे, धनाजी सूळ, हरिभाऊ सूळ, अनिल सूळ यांच्या सहया आहेत.