विभाग प्रमुखांनी सर्व विकास विषयक बाबींचा विचार करुन ग्रामविकासाचा आराखडा तयार करावा – मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । आरोग्य, शिक्षण, पर्यटन रोजगार यासह प्रत्येक गावांच्या भौगोलिक बाबींचा विचार करुन ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावा. तसेच आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2022-23 जिल्हा परिषद विभाग प्रमुख, शासनाच्या विविध विभागांचे जिल्हास्तरावरील विभाग प्रमुख यांचे ग्रामविकास आराखड्यासंबंधी एक दिवसाचे प्रशिक्षण हेरीटेजवाडी, अटाळी, कास रोड, सातारा येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी श्री. खिलारी बोलत होते. या प्रशिक्षणास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बा.क) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण विकास आराखड्यामध्ये शेतीपुरक व्यवसायाचा समावेश करावा, असे सांगून श्री. खिलारी म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनला मोठा वाव आहे. पाटण, महाबळेश्वर, सातारा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने व्हिलेज टुरीझम सारखी योजना राबवावी. यामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम घर, स्वच्छ जेवण यासह पर्यटकांना लागणाऱ्या मुलभूत सुविधा देण्यात याव्यात.

लहान मुले मोबाईलकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत, त्यामुळे मुलांचे वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी शाळांमध्ये वाचनीय पुस्तके देण्याबाबत आराखड्यामध्ये समावेश करावा. विभाग प्रमुखांनीही आराखडा तयार करण्यासाठी नवनव्या कल्पना मांडाव्यात. तसेच गावातील लोकसंख्या, गावाचा व्यवहार, भौगौलिक रचना, स्थानिकांच्या गरजा यांचा विचार करुनच आराखडा तयार करुन त्याची विभाग प्रमुखांनी प्रभावी अंमलबजवणी करावी, असेही आवाहन श्री. खिलारी यांनी केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वाघमळे व यशदाचे प्रशिक्षक यांनी आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!