नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पालकमंत्र्यांकडून चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर विकास कामांचा आढावा

स्थैर्य, अमरावती, दि. 18 : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना नागरी सुविधांच्या कामांकडे दुर्लक्ष होता कामा नये. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व इतर कामे, तसेच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रातील विविध कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मुख्याधिकारी गीता वंजारी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, नगरपालिकेअंतर्गत येणारी कामे राबवत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे पूर्ण करावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन नियोजन करावे. नागरी विकासाच्या कामांसाठी प्राप्त निधीचा विनियोग हा उद्दिष्टानुसारच झाला पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्व प्रभागांना न्याय मिळाला पाहिजे.

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधीचा विनियोग हा त्या योजनेच्या निकषांनुसार व संबंधित परिसराच्या विकासासाठीच वापरला पाहिजे. काटेकोरपणे ही कार्यवाही करावी. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन कामे करावीत. यासंबंधात तक्रारी येता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.

नगरपालिकेच्या हद्दीतील गावठाण जमीनीवर बांधकाम परवानगीस सतत अडथळे येत असल्याच्या तक्रारी येतात. मात्र, सन 2000 पूर्वीचे पुरावे सादर केले तर परवानगी देण्यास हरकत नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी स्पष्ट केले. असे प्रस्ताव खोळंबून ठेवू नयेत. वेळीच परिपूर्ण माहिती घेऊन त्याची परवानगी प्रक्रिया राबवली पाहिजे. सात दिवसांच्या आत परवानगी दिली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सांगितले.

बचत गटांना पतपुरवठ्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न व्हावेत

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांचे भक्कम जाळे उभारून जिल्ह्यातील अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक आहे. यासाठी नाबार्ड, उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर संस्थांचा समन्वय साधून सीआयएफ व इतर निधीतून बचत गटांना कर्ज स्वरूपात सहकार्य मिळवून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

जिल्ह्यातील बचत गटांची स्थिती, संबंधित संस्थांसाठीचा सामुदायिक गुंतवणूक निधी, फिरता निधी व आवश्यक उपाययोजना याबाबत बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, जिल्ह्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक स्वावंलबी होण्यास मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक पतपुरवठा व त्यांच्या सेवा- उत्पादनांचे विपणन यांचे मजबूत जाळे जिल्ह्यात निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी संबंधित सर्व संस्थांनी समन्वयाने भरीव कार्य  केले पाहिजे. बँकांचा व लोकसंचालित साधन केंद्राचा समन्वय झाल्यास गटांना पतपुरवठ्याच्या प्रक्रियेत गती येईल.

त्या दृष्टीने बँकांकडूनही सकारात्मक प्रयत्न व्हावेत. सामुदायिक गुंतवणूक निधी व फिरता निधीतून पतपुरवठ्यात नियमितता ठेवावी. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी पतपुरवठ्यासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही सहकार्य मिळणार आहे. इतर बँकांकडूनही तसे सहकार्य मिळवून उमेद, माविम आदींनी गटांच्या पतपुरवठ्याला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सार्वजनिक वितरण प्रणालीचा आढावा; ग्राम दक्षता समितीच्या बैठका नियमित व्हाव्यात

शासनाकडून प्रत्येक गावात सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्नधान्य वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समितीच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात व त्याचा कार्यपूर्तता अहवाल नियमित पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण प्रणालीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होत्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, शासनाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत नियमितपणे धान्यवितरण होते. गरजू व वंचित घटकांसाठी कोरोनाच्या काळात सार्वजनिक वितरणप्रणालीत अनेक कल्याणकारी निर्णयही राबविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता असावी व गैरव्यवहार टळावा यासाठी ग्राम दक्षता समितीची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यात गावोगाव या समितीच्या बैठका होतात किंवा कसे, याचा तपशील जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे यापुढे ग्राम दक्षता समितीच्या बैठका गावोगाव नियमितपणे व्हाव्यात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने समितीचे गावपातळीवरील सचिव असलेल्या सर्व तलाठ्यांना सूचना द्यावी. या समितीच्या बैठका घेऊन गावकरी बांधवांना अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होते किंवा कसे हे तपासणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे आदी प्रक्रिया नियमितपणे झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते अपंग बांधवाला धनादेश सुपूर्द

अमरावती येथील नागरिक रोशन धांदे यांना दोन्ही पायांना काही दिवसांपूर्वी अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना सहकार्याचा हात म्हणून रतन इंडिया कंपनीच्या सौजन्याने अडीच लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला. रोशन, एक बहीण म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी असेल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी श्री. धांदे यांना दिलासा दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!