दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । मुंबई । संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कीर्तीताईंनी आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला संगीत आणि अभिनयाचा वारसा जपला आणि पुढे वाढवत नेला. आपल्या गोड गायनाने आणि प्रसन्न अभिनयाने कीर्तीताईंनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. संगीत रंगभूमीची सेवा करण्याचे आई-वडिलांचे व्रत त्यांनीही जोपासले आणि खूप कष्ट सोसून संगीत रंगभूमी जागती ठेवली. त्यांचे हे उपकार संगीत रंगभूमी कधीही विसरू शकणार नाही, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.