स्थैर्य, फलटण : मी गेली 20 वर्ष वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करत असल्याने अनेक नेते मंडळी, मोठे पत्रकारांशी तसेच संपादकांशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी लोकमत मध्ये गेली वीस वर्षे काम करीत असलो तरी पुण्यनगरी, मुंबई चौफेर, वार्ताहर या वृत्तपत्रांचा चढता आलेख मी बघितला आहे. या पेपरचे संपादक मुरलीधर शिंगोटे उर्फ बाबा हे तब्बल 11 पेपर चालवीत असल्याने ते खूप श्रीमंत आणि बिझी व्यक्तिमत्व असतील असा माझा नेहमी समज होता. या थोर व्यक्तिमत्त्वाचा संघर्षपूर्ण काळ मी वाचलेला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर होताच, पण आयुष्यात त्यांची कधी भेट होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. 2018 चाली मार्च महिन्यात मला त्यावेळी पुण्यनगरीमध्ये राज्याचे वितरण प्रमुख असलेले माझे मित्र तानाजी पाटील यांचा फोन आला. त्यांनी मी सध्या पुण्यनगरीमध्ये असून तुम्हीपण पुण्यनगरी या असा प्रेमाचा मैत्रीपूर्ण आग्रह धरला. पण मी लोकमतमध्येच सुखी आहे असे सांगून आपली मैत्री वृत्तपत्र क्षेत्राच्या बाहेरही कायम राहील. पण मला आग्रह करू नका असे मी तानाजी पाटील यांना सांगितले. मात्र वारंवार याबाबतीत त्यांचा आग्रह सुरूच होता.
पुण्यात आल्यावर मला भेटा तरी असे त्यांचे म्हणणे असल्याने तसेच त्यांच्याशी बरीच वर्षे भेट न झाल्याने त्याच महिन्यात मी पुणे मुक्कामी असताना सकाळी 8 च्या दरम्यान त्यांना फोन केला. त्यांनी बालगंधर्वजवळ ऑफिस असून ये दुपारी तिकडे असे सांगितले. मात्र मी 11 च्या दरम्यान येतो, असे सांगितल्यावर त्यांनी मी थोडा बाहेर आहे. पण वेळ लागला तरी जाऊ नको. असे सांगितले मी 11 च्या अगोदरच तेथे पोहचलो तर तेथे कोणीच नव्हते आत एक काचेचे केबिन होते. तेथे बाकडयावर एक वयस्कर माणूस झोपलेला होता. मी थोडा वेळ ते उठण्याची वाट बघितली पण ते काही उठेना ऑफिस मध्ये कोणीच दिसत नसल्याने आपण दुसर्या ठिकाणी आलो नाही ना ही शंका वाटल्याने बाहेर जाऊन पुन्हा पुण्यनगरीचे ऑफिस तेच का हे बघून आलो. तानाजी पाटील सरांना पुन्हा फोन लावला. तर त्यांनी ट्रॅफिक मध्ये अडकलोय पण येतोय जाऊ नको असे सांगितले. मी येथे कोणी नाही असे सांगितल्यावर तू बस खुर्ची घेऊन मी येतोच थांब सांगितल्याने मी तेथेच बसलो. ऑफिसमधले फोन वारंवार वाजत असल्याने आत बाकडयावर बसलेली व्यक्ती आवाजाने उठली. त्यांनी इकडे तिकडे बघून माझ्याकडे बघितले आणि विचारले काय काम आहे. मी पाटीलसरांना भेटायला आलोय असे सांगितल्यावर त्यांनी केबिन मधल्या त्यांच्या समोरील खुर्चीवर बसायला सांगितले व पुन्हा त्यांनी ताणून दिली. ऑफिसमध्ये फोन वारंवार वाजत असल्याने त्यांची झोपमोड होत होती. शेवटी अर्ध्या तासाने ते उठले आणि आतल्या बाजूला निघून गेले.
तेवढ्यात तानाजी पाटीलसर आले त्यांनी माझी गळाभेट घेऊन बसायला सांगितले. त्यांच्याशी बोलत असताना मी ऑफिसमध्ये कोणीच कसे नाही. असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हळू आवाजात अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यामुळे बर्याच जणांना कामावरून काढले आहे ठराविक जण दुपारनंतर येतील. असे सांगत असताना ती वयस्कर व्यक्ती तोंड पुसत आत आल्यावर तानाजी पाटील खाडकन उभे राहिले मी पण त्यांच्यामुळे उभा राहिलो. ती वयस्कर व्यक्ती टेबलामागील आराम खुर्चीवर न बसता पुन्हा बाकड्यावर बसल्याने माझ्या मनात हे कोण असा प्रश्न निर्माण झाला मी त्यांच्याकडे बघू लागल्यावर त्या वयस्कर व्यक्तीने माझ्या मनातले भाव ओळखून स्मितहास्य केले. त्यामुळे मी अधिकच बुचकळ्यात पडलो असताना तानाजी पाटील यांनी हे पुण्यनगरीचे मालक संपादक बाबा आहेत, अशी ओळख करून दिल्यावर पुन्हा मी उभा राहिलो. त्यांना नमस्कार घातला बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत अरे बस बस गोंधळू नकोस, असे सांगून मला खाली बसविले.
माझ्या मनात एवढा 11 पेपर चा मोठा मालक साध्या बाकड्यावर झोपतोय आणि बसतोय हे बघूनच आश्चर्याचे भाव उमटले होते. त्यांना बघून तोंडातून शब्द फुटत नव्हते माझी अवस्था बघून त्यावर पाटीलसरांनी बाबा असेच राहतात. रात्रभर आम्ही दोघे प्रेस मध्ये होतो. तसेच अंक वितरित होणार्या काही गावांमध्ये फिरून सकाळी आठ वाजता पुन्हा ऑफिसमध्ये आलो आहोत. रात्रभर झोपलोच नव्हतो हे सांगितल्यावर बाबांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला. आपण एवढ्या दिगग्ज मोठ्या माणसाला भेटतोय याचा मला अभिमान वाटला. तसेच माझ्या माझ्या मनात यापूर्वी मालक म्हणजे हाय-फाय व्यक्ती असेल ही कल्पनाच लुप्त झाली. पाटीलसरांनी फोनवरून चहा मागितला आम्ही तिघांनी चहा घेतला बाबांनी माझी खयाल खुशी विचारून भरपूर गप्पा मारल्या दुपारी दीडच्या दरम्यान ऑफिसमधला स्टाफ येऊ लागला. एकेक जण येताना बाबांना नमस्कार करत होता बाबाही हसून त्यांना प्रतिसाद देत होते. अधून मधून त्यांच्या मोबाईल येणार्या फोन वरून समंधितांना पेपर विषयीही सूचना देत होते. या वयातही त्यांचे पेपरवर असलेले बारीक लक्ष मला नवा अनुभव देत होते. कामाविषयी त्यांची प्रामाणिकता दिसत होती.
यादरम्यान मेस मधून दोन डबे आले एक बाबांचा तर एक पाटीलसरांचा होता. त्यामुळे मी त्यांच्या जेवणात व्यत्यय नको म्हणून निघतो, असा निरोप घेऊ लागलो असता दोघांनी मला जेवणाचा आग्रह केल्याने त्यांच्याबरोबरच त्यांच्या डब्यात मी जेवलो. अत्यंत साधे जेवण एवढा मोठा माणूस जेवतोय तेही माझ्या सारख्या सामान्य पत्रकारासोबत याचे मनोमन मला आश्चर्य वाटत होते. मी बाबा तुम्ही घरी जात नाही का ? असा प्रश्न केल्यावर बाबांनी सध्या पुण्यात बर्याच अडचणी आहेत. त्यामुळे मला वैयक्तिक लक्ष द्यावे लागत आहे. मी बसवीलेली घडी मला बिस्कुल विस्कटू द्यायची नाही. त्यामुळे मी या वयातही प्रत्येक गोष्टीत लक्ष देत असतो. या क्षेत्रापासून मी दूर राहू शकत नाही. घरी बसून पण काय करू त्यापेक्षा वृत्तपत्र जवळ राहणे हेच मला आवडते असे सांगितले.
पाटील सरांनी तुम्ही पुण्यनगरीचे सातारा आवृत्तीची जबाबदारी घ्या, असे सांगितले. बाबांनीही तुझ्याबद्दल फार ऐकले आहे. तू जबाबदारी घे तुला मी सर्व गोष्टी तेथे येऊन मी शिकविल तेथेही घडी बसवायची आहे. असे सांगितले मात्र मी फलटण सोडू शकत नाही आणि सातारा रहायचे म्हटले तर मला फलटण सोडून सातारा मध्ये स्थायिक व्हावे लागेल. मला परवडेल असा पगारही मिळाला पाहिजे. इतर दैनिकांच्या तुलनेत तरी पगार मिळाला पाहीजे असे मी सांगितले. त्यापेक्षा मला लोकमत मध्येच राहून द्या असे मी आग्रहाची विनंती केल्यावर बाबांनी आमच्याकडे पगार कमी असतात तुझे म्हणनेही रास्त आहे. तुलाही परवडले पाहिजे असे सांगितलेवर तो विषय तेथेच थांबला. त्यांनतर अजून त्यांच्याशी तासभर गप्पा मारून मी समाधानाने बाहेर आलो. पाटीलसर मला बाहेर सोडायला आले. त्यांनी मला पगाराची अपेक्षा विचारली. मात्र मी नंतर सांगतो, असे सांगून तो विषय टोलवुन लावला. आणि इतर विषयावर बोलत असताना बाबा खाली आले माझ्या खांद्यावर हात ठेवून पुण्यात आल्यावर मला आवर्जून भेटत जा, फोन करत जा असे सांगून पुन्हा वर ऑफिसमध्ये गेले. एवढा मोठा माणूस आपल्याशी बोलतोय, विचारपूस करतोय, जेवण करतोय, खाली येऊन पुन्हा भेटायला येत जा, असे सांगतोय ही भावनाच मला त्यांच्यातील माणुसकी दाखवली. जमिनीवर राहणारा हा माणूस माझ्या मनाला भावला. त्यांच्या निधनाची बातम्या समजतात मन सुन्न झाले. डोळ्यात अश्रू आले, त्यांच्याशी झालेली एकमेव भेट पुन्हा आठविली. त्यांचा साधेपणा आणि विनम्रता मला आठविली. जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळावी यासाठी प्रार्थना करतो. संघर्षशील व विनम्र अशा बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली !
– नसीर शिकलगार
फलटण तालुका प्रतिनिधी, दैनिक लोकमत