
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । सहकारमहर्षी हणमंतराव पवार (अण्णा) यांची कन्या सौ. पल्लवी प्रवीण पाटील यांची कन्या कु. ऋतुजा पाटील यांचा वाड:निश्चय समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्याशी गुरुवार (१० एप्रिल) रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.
प्रवीण पाटील हे पुणे येथील मोठे व्यावसायिक आहेत. ते आयडीया या टेलीकॉम कंपनीत सीईओ म्हणून काम करत होते. सांगली येथील माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे ओएसडी म्हणूनही प्रवीण पाटील यांनी काम केले आहे. रिलायन्स ग्रुपचे व्हाईस प्रेसीडेंट म्हणूनही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. तदनंतर पाटील यांनी स्वतःचा ‘जायंट सायकल’ म्हणून सायकल मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड सुरू केला आहे. सध्या ते मल्टीनॅशनल कंपन्याना कन्सल्टन्सी करण्याचे काम करतात.
सहकारमहर्षी हणमंतराव पवार (अण्णा) यांची नात बारामतीची सून होणार असल्याची बातमी येताच पुन्हा एकदा निरा खोऱ्यातील फलटण आणि बारामती या लगतच्या तालुक्यातील रोटी-बेटीच्या असणाऱ्या व्यवहारांना परिसरात उजाळा मिळाला आहे.