दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महत्वाकांशी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेली महिनाभर सर्वत्र चर्चेत होती. ही योजना आज सत्यात उतरली आहे. अनेक टीकाटिपण्णीला कृतीतून उत्तर देत महायुती सरकारने या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. फलटण तालुक्यातील बहुतांशी बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदरच ओवाळणी रुपाने ३००० रुपये खात्यामध्ये जमा झाल्याने महिला-भगिनींच्या चेहर्यावर त्याचा आनंद दिसत आहे, असे शिवसेना फलटण तालुकाप्रमुख, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फलटण तालुका सदस्य नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी म्हटले आहे.
अनेक भगिनी फोनवरून तसेच काही भगिनी पैसे जमा झाल्याचे स्क्रीन शॉट काढून ते पाठवून लाडक्या भावाचे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करत आहेत. अगोदर एस.टी. तिकिटात ५०% सवलत, तसेच तीन सिलिंडर मोफत देणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांमुळे महिलांना सन्मान देणे तसेच महिला सबलीकरणाचा उद्देश घेऊन मुख्यमंत्री शिंदे लोकनाथ म्हणून महाराष्ट्राच्या महिला भगिनी मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ म्हणून आशिर्वाद देताना दिसत आहेत.
लाडकी बहीण योजनेमधून फलटण तालुक्यातील जवळपास ३० टक्के महिलांचे पैसे दोन हप्त्यांचे जमा झाले आहेत.
दरम्यान, ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांनी आपले खाते बँकेला आधार लिंक करून घ्यावे. त्याच अकाउंटला पैसे जमा होत आहेत. अद्यापही तालुका व जिल्हा प्रशासन तसेच राज्य प्रशासनातर्फे हप्ते सोडण्याचे काम सुरू असून शिल्लक लाभार्थी महिला भगिनींचे हप्ते लवकरच जमा होणार आहेत. तसेच लाभार्थी महिलांंना आवाहन आहे की ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी महिलांना केले आहे.