
स्थैर्य, मुंबई, दि.११: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने हवाई प्रवास करण्याची परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यपाल आणि राज्य सरकारमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी सवांद साधत असताना अजित पवार म्हणाले की, राज्यापालांना विमान प्रवास नाकारल्याबाबत काहीच माहिती नाही. मंत्रालयात जाऊन संबंधित विभागाकडून माहिती घेईन’, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील याबाबत माहित नसल्याचे सांगितले आहे.
ही खूप धक्कादायक घटना आहे- गिरीष महाजन
याप्रकरणी भाजप नेते गिरीष महाजन म्हणाले की, राज्यपाल हे राज्यातील सर्वोच्च पद आहे. अशा पदावरील माणसाला तुम्ही परवानगी नाकारता, हे खूप शॉकिंग आहे. यातही हद्द म्हणजे, राज्यपालांना तुम्ही विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे सांगता. हा वाद बरोबर नाही, संविधानाला धरुन नाही,’ असे महाजन म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज उत्तराखंडमधील दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी विमानाने तिथे जाणार होते. पण, सरकारने त्यांना राज्य सरकारच्या विमानातून जाण्यास परवानगी नाकारल्यामुळे परत यावे लागले.