दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राजधानी दिल्लीत महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) अभियानाचे कौतुक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदन येथे माहिती विभागाच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री.कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना राजधानी दिल्लीत ‘घरो घरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. श्रीमती अरोरा यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी ध्वज प्रतीक बॅच राज्यपाल यांना लावला.
‘घरो घरी तिरंगा’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाद्वारे तयार करण्यात आलेले जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघुचित्रपट हे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमाद्वारे रोज प्रसारित केले जात आहे. यासह उभय महाराष्ट्र सदनातील दर्शनीय ठिकाणी असलेल्या दूरचित्रवाणीवर प्रदर्शित केले जात असल्याची माहिती श्रीमती अरोरा यांनी यावेळी राज्यपाल यांना दिली.
दिल्लीतील मराठी मंडळ, मराठी शाळा यामध्ये देखील ध्वनीचित्रफीत, गीत ऐकविले जातील. तसेच दिल्लीस्थित मराठी माध्यमांचे वरिष्ठ प्रतिनिधी, प्रतिनियुक्तीवर असलेले महाराष्ट्र कॅडरचे सनदी अधिकारी, मराठी भाषिक दिल्लीतील साहित्यिक, मूळ महाराष्ट्रातील असलेल्या पण दिल्लीत ठसा उमटवलेल्या वरिष्ठ मान्यवरांच्या वतीने ‘घरो घरी तिरंगा’ अभियानाचा उद्घोष करणारी ध्वनीफीत प्रसारित करण्याबाबतचे नियोजन असल्याबाबतची माहिती श्रीमती अरोरा यांनी राज्यपाल यांना दिली. या अभियानाला राज्यपाल श्री कोश्यारी यांनी परिचय केंद्राच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या अभियानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या भेटीत महाराष्ट्र परिचय केंद्राचे रामेश्वर बरडे, रघुनाथ सोनवणे, राजेश पागदे, श्री. पाले उपस्थित होते.