दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२३ । फलटण ।
तालुका, जिल्हास्तरापर्यंत ते राज्यस्तरीय पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आगामी काळामध्ये जर पत्रकारांचे प्रश्न शासनाकडून सकारात्मक रित्या सोडवून घ्यायचे असतील तर फलटणच्या सर्व पत्रकारांनी एकी एकसंघ ठेवावी; असे आवाहन पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य तथा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी केले.
सातारा येथील हरीष पाटणे व चंद्रसेन जाधव यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल फलटण मधील पत्रकारांच्या वतीने सत्कार समारंभ सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केला होता. यावेळी पाटणे बोलत होते. यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, दैनिक लोकमतचे आवृत्तीप्रमुख दीपक शिंदे, दैनिक पुण्यनगरीचे जाहिरात विभाग प्रमुख संतोष कदम यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटणे म्हणाले की, आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यामधील सर्वसामान्य पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत. यापूर्वी सुद्धा जिल्ह्यातील पत्रकारांच्यासाठी विविध योजना आपण राबवलेल्या होत्या. अधिस्वीकृती समितीवर सदस्य झाल्यामुळे आगामी काळामध्ये जिल्ह्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यामध्ये कसलीही अडचण येऊ देणार नाही.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वच पत्रकार कार्यरत आहेत. हरीष पाटणे यांच्या नेतृत्वामुळे आज पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची जी संधी मिळालेली आहे; ती संधी आगामी काळामध्ये सुद्धा आपण वाया जाऊ देणार नाही, असे मत चंद्रसेन जाधव यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांची जी सुरुवात आहे; ती अत्यंत संघर्षाच्या काळामधून झालेली आहे. खंडाळा तालुक्यामधील त्यांच्या गावामधून धोम बलकवडीचा जो कालवा जात होता; तो कालवा जात असताना काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या होत्या; त्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी हरीष पाटणे यांनी मोठा संघर्ष उभा केलेला होता. या सर्व घटनांचे आपण साक्षीदार असून अशा संघर्ष केलेल्या व्यक्तीला जर शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे नेमकेपणाने या संधीचे पाटणे हे नक्कीच सोने करतील व आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी पाटणे कार्यरत राहतील; यामध्ये कसलीही शंका नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी यावेळी व्यक्त केले.
तालुकास्तरावर काम करत असताना सर्वसामान्य पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामधून जेव्हा अधिस्वीकृतीसाठी अर्ज केला जातो; त्यावेळी वृत्तपत्राकडून सुद्धा सहकार्य केले जात नाही. वृत्तपत्र हे पत्रकारांचा वापर फक्त आणि फक्त जाहिरात प्रतिनिधी म्हणूनच करत असते. पत्रकारांना नेमणुकीचे पत्र सुद्धा वृत्तपत्राकडून देण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित पत्रकाराला अधीस्वीकृती मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तरी आगामी काळामध्ये हरीष पाटणे यांच्या नेतृत्वात सदरील अट शासन दरबारी शिथिल करण्याची मागणी करून ती मान्य करून घ्यावी; असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी यावेळी केले.
यावेळी फलटण येथील पत्रकार रोहित अहिवळे, किरण बोळे, यशवंत खलाटे, वैभव गावडे, युवराज पवार, पोपट मिंड, सतीश जंगम यांच्यासह विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हरीश पाटणे व चंद्रसेन जाधव यांना शुभेच्छा दिल्या.