स्थैर्य, मुंबई, दि.३ : महाविकास आघाडी सरकारने अंधेरी येथील महाकाली लेणी बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. सुमारे २ हजार वर्षांपूर्वीच्या या लेणी व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार करणा-या ठाकरे सरकारच्या या बेकायदेशीर कृतीचा आज भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाकाली लेणी येथे सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा नेते किरीट सोमैय्या हे देखील उपस्थित होते.
प्रविण दरेकर म्हणाले, “ठाकरे सरकार मुंबई विकायला निघालं आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणा-याला, चाळीत राहणा-याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतू सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.”
सत्तेत आल्यापासून सरकार मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजपा नेहमी जनतेच्या पाठीशी आहे. म्हणूनच इथल्या नागरिकांवर अन्याय होत असताना आम्ही येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही, असेही दरेकर यावेळी म्हणाले.