ज्वेलरी मशिनच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । मुंबई । जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे  असेल  तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर ‘ज्वेलरी मशिनरी ॲण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन दि. 5 ते दि. 8 एप्रिल या दरम्यान होत आहे. यात ज्वेलरी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे मशिन्स तसेच इतर सोयींची माहिती इथे मिळाणार आहे.

प्रदर्शनात  सहभागी सर्वांचे अभिनंदन करुन श्री. देसाई म्हणाले, या प्रदर्शनात सहभागी लोकांमुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळेल. जेम्स ॲन्ड ज्वेलरीसाठी नवी मुंबईत शंभर एकर जागा दिली आहे. त्याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुमारे एक हजार उद्योग उभे राहतील आणि  दिड लाख रोजगार निर्माण  होणार आहे. याशिवाय लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. याचबरोबर देशांतील सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर पार्क तयार होणार आहे.

जागतिक स्तरावर भारतातील कारागिरांनी जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रात उत्तम काम केले आहे. मूल्यवान रत्न विक्रीत भारत कायम अग्रस्थानी आहे.  भारतातील कारागिरांच्या कौशल्याला जगभरातून मागणी आहे. ही कला या कारागिरांनी परंपरागत व्यवसायातून जीवंत ठेवली आहे. या क्षेत्रात आपली परंपरागत डिजाईन आणि कलाकारी आहे याचा कोणालाही मुकाबला करता येणार नाही, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

कला ही कारागिरांच्या हातात असते. मशिन्स हे कारागिरांना मदत करण्यासाठी उपयोगी पडावे, त्यांच्या कार्यवृद्धीत सहयोगी व्हावे त्यांच्या कारागिरीला पर्याय निर्माण करण्यासाठी मशिन्सचे आक्रमण व्हायला नको. मेहनत कमी व्हावी मात्र त्यांची कला जिवंत रहावी, अशी अपेक्षा उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!