विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार


दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । मुंबई । विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास सरळसेवा भरतीत देण्यात आलेले दोन टक्के आरक्षण कायम रहावे तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासन सर्वतोपरी या घटकाच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे  वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी, उपसचिव सिद्धार्थ झाल्टे, उपसचिव कैलास साळुंखे, महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघाचे अशोक इंदापुरे, सैवे रामुलू, रविंद्र कमटम, राजू गाजेंगी, विष्णू कुटे, विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे बालाजी चिनके यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, विशेष मागास प्रवर्गात सरळसेवा भरतीत देण्यात आलेले आरक्षण टिकावे यासाठी शासनाकडून मा.उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल. तसेच अनुसूचित जाती- जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षिणिक सवलती विशेष प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू करणे, शुल्क सवलती, क्रिमीलेअरची अट लागू न करण्याबाबत, जात दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभरीत्या देणे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयान्वये देण्यात येणाऱ्या सुविधा सर्व विद्याशाखेत अभ्यासक्रमासाठी लागू करणे, स्वतंत्र आर्थिक विकासमहामंडळ स्थापन करणे, हातमाग कारागिरांना आधुनिक हातमाग उपलब्ध करुन देणे, यंत्रमाग व्यवसायासाठी सवलती देणे, जातनिहाय जनगणना करणे याबाबतीत शासन सर्वतोपरी कार्यवाही करेल, अशी ग्वाही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

भातु कोल्हाटी समाजाच्या विकासासाठी 10 कोटी रूपयांची तरतूद करणार

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, भातू कोल्हाटी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख रुपये कर्जाची मर्यादा वाढवून दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जाची योजना आणणार असून या समाजातील गरजू कलावंतांना शासनाकडून सुलभरित्या कर्ज मिळावे व त्यांचा आर्थिक विकास व्हावी. यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही मंत्रायातील परिषद सभागृह येथे आयोजित बैठकीत दिली. यावेळी आखिल भारतीय महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंताच्या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते.

यावेळी बैठकीला अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत संघटनेचे अरुण मुसळे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!