स्थैर्य, उस्मानाबाद, दि. २१: जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे
झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. शेतकऱ्यांनी
धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून शेतकऱ्यांना मदत
देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे
प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या
सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत केले.
या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा
उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी
योजना मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा
परिषदचे अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री ज्ञानराज
चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास घाडगे-पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान
सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे
विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी उमेश घाटगे यांच्यासह जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत
देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे
सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत.
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना
सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा तसेच हा आराखडा
करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचाही कामनिहाय क्रम
ठरवून घ्यावा. मराठवाड्याचा लातूर उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे त्या
शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची
नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे
कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज
बांधता येत नाही. काटगाव (ता. तुळजापूर) येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके
पाणी गेले त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली. येणाऱ्या
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल,
असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.