प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व अन्य पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी वगैरे |
स्थैर्य, फलटण : शेतीला जोड धंदा म्हणून सुरु करण्यात आलेला दुग्ध व्यवसाय शासनाच्या धोरणामुळे आर्थिक संकटात सापडला असल्याने प्रति लिटर ३० ते ३२ रुपये असलेला दुधाचा दर १८ ते २० रुपयांपर्यंत खाली आल्याने दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे, त्यासाठी शासनाने दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर प्रति लिटर किमान ५ रुपये अनुदान त्वरित जमा करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर दूध बंद व ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक असे अनोखे आंदोलन छेडले, सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनात सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे, बाळासाहेब शिपकुले, शिवाजी सोडमिसे, प्रल्हाद अहिवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
माणकेश्वर मंदिर येथे दुग्धभिषेक घालताना धनंजय महामुलकर, नितीन यादव, सचिन खानविलकर वगैरे. |
शेतीला जोडधंदा म्हणून सुरु करण्यात हा व्यवसाय प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, महिला वगैरे विविध समाजघटकांसाठी आधार ठरत असताना शासनाच्या धोरणामुळे कोलमडून पडण्याच्या स्थितीत आला असून त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच आर्थिक कोंडी झाल्यामुळे शासनाने या दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर प्रतिलीटर ५ रुपये अनुदान स्वरुपात त्वरित जमा करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनातील मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना धनंजय महामुलकर व सहकाऱ्यांनी दिले व शासनापर्यंत पोहोचवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली.
दरम्यान फलटण येथे माणकेश्वर मंदिर आणि साखरवाडी, सोमंथळी वगैरे तालुक्यातील अन्य गावात भगवान शिव मंदिरासह अन्य ग्रामदैवतांना दुग्धभिषेक घालण्यात आला. आंदोलन शांततेच्या मार्गाने करोना वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम निकषांचे पालन करुन छेडण्यात आले.
फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागात पोलीस पाटील यांची पोलीस यंत्रणेला चांगली मदत झाली.