उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते बांधावर होणार खत, बियाण्याचे वाटप
स्थैर्य, सातारा दि. 10 : सातारा जिल्ह्यातील खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खत, बि-बियाणे शासनाकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर खत-बियाणे देणे सुरु आहे. उद्या दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वा. राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उंब्रज मंडळातील निगडी गावच्या शिवारात खत, बियाणे वाटप होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.
कोरोनामुळे जगभरात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विकसित बलाढय राष्ट्रांनाही याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली. आर्थिक हानी बरोबर मोठी मनुष्यहानी जगभरात झाली. भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून योग्यवेळी लॉकडाऊन जाहीर केले. राज्यानेही याबाबत अग्रही राहून लॉकडाऊन जाहीर केले. लोकांनीही याला प्रतिसाद देत 100 % तूरळक बाबी सोडून लॉकडाऊन पाळला. अर्थचक्र थांबले होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मात्र कृषी क्षेत्र या निर्बंधापासून दूर ठेवले होते. त्यामुळेच सगळे बंद असतानाही रोज हजारो क्विंटल भाज्याची आवक बाजार समित्यांमध्ये होत होती. ती लोकांच्या दारापर्यंत जात होती. सगळीकडे बंद बंद असतानाही अत्यावश्यक, जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीत खंड नव्हता, त्यामुळे घरी बसूनही लोकांपर्यत भाजीपाला पोहचत होता. खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खत, बि-बियाणे पुरविण्यासाठी शासन या काळात प्रयत्नरत होते. याचाच भाग म्हणून उद्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उंब्रज मंडळातील निगडी या गावाच्या शिवारात जाऊन खत आणि बियाणे वाटणार आहेत.
• खरीपाची तयारी – माहे मार्च, एप्रिल हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीचा काळ. या काळात शेती संबंधित सर्व बाबींना सुट देण्यात आली होती. शासनाने खत-बियाणे शेतीच्या बांधांपर्यत पोहचविण्याची व्यवस्था केली होती. सातारा जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 1 लाख 2 हजार 923 मेट्रिक टन एवढ्या खताची मंजूरी देण्यात आली आहे.
• 59 हजार 943 मेट्रिक टन खताची उपलब्धता जिल्ह्यात होती त्यापैकी 47 हजार 173 मेट्रिक टन एवढी विक्री झाली असून आता बाजारात 25 हजार 857 मेट्रिक टन खताची उपलब्धता आहे.
• सोयाबिन, भात, मका आणि खरीप ज्वारी या प्रमुख पिकांच्या बियाण्याची जिल्ह्याची मागणी 47 हजार 804 क्विंटल एवढी होती.
• 11 हजार 309 क्विंटल एवढी बियाणांची उपलब्धता होती. पैकी 4 हजार 662 क्विंटल एवढे बियाणे विकले गेले. आता 6 हजार 946 क्विंटल एवढे बियाणे अजूनही बाजारात उपलब्ध आहेत.
शेतकऱ्यांच्या बांधांवरमुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यत बि-बियाणे पोहचवू असे सांगितले होते. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार 933 गटांमार्फत 4 हजार 673 मेट्रिक टन खत आणि 1 हजार 975 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बाधांवर पोहचविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली
खरीप पीक कर्ज वाटप.. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 1 लाख 23 हजार 645 शेतकऱ्यांना एकूण 692.97 कोटी पीक कर्ज वाटप करण्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी दिली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने 1 लाख 18 हजार 765 शेतकऱ्यांना 629.76 कोटी कर्ज वाटप केले आहे व इतर बँकांनी 4 हजार 880 शेतकऱ्यांना 63.21 कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप पेरणीसाठी आतापर्यत 57 टक्के कर्ज वाटप केले आहे.
इतर बँकांनी खरीप पेरणीसाठी आतापर्यत 10 टक्के कर्ज वाटप केले आहे, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधक (सहकार) प्रकाश अष्टेकर यांनी दिली.