स्थैर्य, सोलापूर, दि.१९: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मागितलेल्या मदतीवरुन विरोधकांवर सडकून टीका केली. ‘राज्यात अतिवृष्टी आली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं? केंद्रातील सरकार हे देशातील सरकार आहे. परदेशातील सरकार नाही,’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचे सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. त्यांनी पक्षपात न करता मदत करणे अवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन मदतीचे आश्वसन दिले आहे. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार, यापेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे’, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल
नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. आजच मला परिस्थिती कळली असे नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. उद्या परवाही मी येणार आहे. शेतकरी संकटाच्या डोंगरात आहे. त्यामुळे दिलासा आणि धीर देण्यासाठी आलो. अजिबात काळजी करु नका. चिंता करू नका. जे करणे शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही’, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगितले.
पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल
अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले की, सध्या आम्ही नुकसान किती झाले, याची माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरू आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल.