ना. शंभूराज देसाईंच्या कराड येथील आढावा बैठकित अधिकाऱ्यांना सुचना
स्थैर्य, दौलतनगर दि.11: गतवर्षीपेक्षा यंदा कोयना धरणामध्ये दुप्पट पाणी साठा असल्याने अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये धरणाचे पाणीसाठयामध्ये वाढ झाल्यास कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोयना नदीकाठी असलेल्या सुपने मंडलातील गावांमध्ये पुरपरिस्थतीचा संभाव्य धोका ओळखून पावसाळयातील अतिवृष्टीच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाकरीता सुपने मंडलातील सर्व शासकीय यंत्रणेने तयार रहावे, अशा सुचना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह,कराड या ठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सुपने मंडलातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, प्रातांधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव,तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी आपपसाहेब पवार,कराड शहरचे पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील,ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ,उंब्रज सपोनी अजय गोरड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आडके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक पाटील, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभिमन्यू राख, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय पवार, लघुसिंचन उपअभियंता पद्माळे, वनक्षेत्रपाल काळे, आगार व्यवस्थापक जे. डी. पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, सह. आयुक्त पशुसंवर्धन डी.बी.बोर्डे, जि. प. बांधकाम विभागाचे आर. एस. भंडारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. के. पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ना. शंभूराज देसाई म्हणाले, लवकरच पावसाळा सुरु होणार असून यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणातील पाणीसाठा हा दुप्पट असल्याने पावसाळयामध्ये धरण पाणलोट क्षेत्रातून जादा पाण्याची आवक झाल्यास कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोयना नदीकाठी अतिवृष्टीच्या काळात मुसळधार पाऊस तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकरीता सुपने मंडलातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी तयार रहावे, अशा सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. याकरीता सुपने मंडलामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक पुलाचा सर्व्हे तात्काळ करुन त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा.जेणेकरुन धोकादायक पुलांच्या बाजूने पर्यायी वाहतूक सुरु ठेवता येईल. आपत्तीच्या कालावधीमध्ये वाहतुक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करण्याकरीता बांधकाम विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवावी. दरम्यान तांबवे येथील पुलाचे ठिकाणी पाणी साचून त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या पुलाची पाहणी करुन त्याचा अहवालही सादर करावा. तसेच सुपने मंडलांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी पाण्याचे निर्जंतुकीकरण करुन गावामध्ये नालेसफाईची व नळ पाणी पुरवठा योजनांच्या ठिक-ठिकाणी असलेल्या पाण्याच्या गळतीच्या दुरुस्तीची कामे करावित. त्यामुळे पावसाळयात साथींच्या रोगाचा प्रसार होणार नाही. सर्व नळ पाणी पुरवठा योजनांमधून गावांना सुरळीत पाणी पुरवठा होण्याचेपदृष्टीने नळ पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती पाणी पुरवठा विभागाकडून करावी. तसेच पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाचा वेग वाढवून 100 टक्के लसीकरण करावे. आपत्तीच्या कालावधीमध्ये जून महिन्याबरोबर जुलै महिन्यातील धान्य पुरवठयाची मागणी असेल तर पुरवठा विभागाकडून धान्य पुरवठा करण्यात येऊन खरीप पेरणीच्या अनुषंगाने आवश्यक बी बियाणे, खते याची उपलब्धता करण्यात यावी, अशा सुचना देऊन त्यांनी पुढे म्हंटले आहे की, अतिवृष्टीच्या काळात तसेच कोयना धरणातून सोडण्या येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीज पुरवठा खंडीत केला जातो. अशावेळी किमान रात्रीच्यावेळी विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. पावसाळयातील साथीचे आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा, तसेच आपत्तीच्या काळात महसूल व पंचायत समितीचा आरोग्य विभाग यांचा संयुक्त कॅम्प संबंधित गावामध्ये ठेवावा अशा सूचना आरोग्य व महसूल विभागाला देऊन आपत्तीच्या काळात सुपने मंडलातील सर्वच शासकीय यंत्रणेने तातडीने उपाय येाजना करण्यासाठी तयार राहून प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना ना. शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.